व्यासंगी साहित्य संशोधक व गोव्यातील ख्रिस्ती मिशनर्यांच्या मराठी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक तसेच नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल बाबू तथा वि. बा. प्रभुदेसाई (८५) यांचे काल सकाळी पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मूळचे खरेगाळ – पैंगीण येथील डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांनी आपल्या प्रदीर्घ साहित्यिक कारकिर्दीत अनेक मौलिक ग्रंथसंपदेची निर्मिती केली.
ज्येष्ठ गोमंतकीय संशोधक डॉ. अ. का. प्रियोळकर यांच्या परंपरेतील संशोधक असा त्यांचा लौकीक होता. ख्रिस्ती मराठी वाङ्मयाचे संशोधन करून ‘ख्रिस्ताच्या वधस्तंभारोहण प्रसंगीचे विलाप’, ‘वनवाळ्याचो मळो’, ‘क्रिस्ताचे यातनागीत’, ‘सर्वेश्वराचा ज्ञानोपदेश’ आदींचे संपादन त्यांनी केले होते. प्रा. अ. का. प्रियोळकर स्मृतीग्रंथाचे संपादन, मराठी वाङ्मयकोश प्राचीन खंडाचे सहसंपादन, तसेच गोमंतकीय मराठी वाङ्मयाच्या इतिहासाच्या पहिल्या खंडाचे सहसंपादन त्यांनी केले होते.
१४ जानेवारी १९३२ रोजी खरगाळ, पैंगीण येथील प्रभुदेसाई घराण्यात त्यांचा जन्म झाला. या घराण्याने शिक्षणाची गंगा काणकोण तालुक्यात पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. ते कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र असून ‘प्रेमानंद’ या नावाने ते परिचित होते. रामचंद्र, नारायण ऊर्फ सुरेश व वसंत हे तीन बंधू, सुमन ही बहीण अशा कुटुंबात वाढलेल्या डॉ. प्रभुदेसाईंचे प्राथमिक शिक्षण मुष्टिफंड संस्थेच्या शाळेत झाले. त्यानंतर तेसेरू आनु द लिसेंव पर्यंतचे शिक्षण घेताना फ्रेंच भाषा त्यानी अवगत केली. १९४७ साली कारवारच्या हिंदू हायस्कूलमध्ये ते मराठी व संस्कृत शिकले.
कारवारच्या हिंदू हायस्कूलमधूनच १९५१ साली त्यांनी मॅट्रिक्युलेशनची परीक्षा दिली. त्याच दरम्यान अ. का. प्रियोळकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनात स्वयंसेवक म्हणून काम करीत असताना ज्येष्ठ पत्रकार ग. त्र्यं. माडखोलकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला व त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी पुढे नागपूर विद्यापीठात उच्च शिक्षण घेतले. १९५५ साली मराठी व संस्कृत विषयात नागपूर विद्यापीठातून त्यांनी बी. ए. ची पदवी संपादित केली व संपूर्ण मराठी विषय घेऊन १९५७ साली एम. ए. परीक्षेत गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले. ‘सतराव्या शतकातील गोमंतकी बोली’ हे भाषाशास्त्रीय संशोधन करून त्यांनी पीएच. डी. पदवी संपादित केली. याच नावाने त्यांचा हा संशोधनात्मक ग्रंथ १९६३ साली प्रकाशित झाला. बेळगावच्या राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये त्यांनी प्रारंभी अध्यापन केले. त्यानंतर नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात अधिव्याख्याता म्हणून त्यांची नेमणूक झाली. नंतर ते विभाग प्रमुख बनले. विदर्भ मराठी साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ चे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. १९९२ साली मराठी विभाग प्रमुख पदावरून ते निवृत्त झाले. गोव्यात मराठीला राजभाषेचे स्थान मिळायला हवे यासाठी ते आग्रही होते व त्यासंबंधी त्यांनी सातत्याने लिखाणही केले. डॉ. प्रभुदेसाई यांच्या पश्चात पराग, मिलिंद हे दोन पुत्र व पत्नी सुवर्णा व अन्य परिवार आहे.