दुखापतीतून सावरलेले भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयराम व सौरभ वर्मा आजपासून सुरू होणार्या १५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या ‘न्यूझीलंड सुपर ३००’ स्पर्धेत आपल्या तंदुरुस्तीची चाचणी घेणार आहे. या स्पर्धेद्वारे आपला गमावलेला फॉर्म व पकड पुन्हा मिळविण्याची या द्वयीला संधी आहे.
पायाच्या दुखापतीनंतर जवळपास ८ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर या चायना ओपनद्वारे स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये पुनरागमन केलेला जयराम आपल्या मोहिमेची सुरुवात तैवानच्या चौथ्या मानांकित सू जेन हाओ याच्याविरुद्ध करेल. कोपराच्या दुखापतीमुळे स्वीस ओपननंतर प्रथमच सौरभ खेळताना दिसणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या अभिनव मनोटा याच्याविरुद्ध तो शुभारंभी सामना खेळेल. सिंगापूर ओपन विजेत्या बी.साई प्रणिथसमोर इस्रायलच्या मिशा झिलबरमॅन या तुलनेने दुबळ्या प्रतिस्पर्ध्याचे आव्हान असेल तर माजी राष्ट्रीय विजेत्या समीर वर्माला इंडोनेशियाच्या सोनी ड्वी कुंकोरो याच्याशी दोन हात करावे लागतील. भारताचा युवा उदयोन्मुख खेळाडू लक्ष्य सेनसमोर मलेशियाच्या जून वेई चिम याचे कडवे आव्हान असेल. पुरुष एकेरीच्या अन्य भारतीय खेळाडूंमध्ये शुभंकर डे विरुद्ध टॉमी सुगियार्तो व करण राजन रंजन विरुद्ध कांताफोन वांगचारोईन असे सामने रंगतील.
महिला एकेरीत सायना, सिंधू हे स्टार खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत. त्यांच्या अनुपस्थिती वैष्णवी रेड्डी जक्का व रितुपर्ण दास यांच्यावर मदात असेल. वैष्णवी आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाच्या ह्सुआन यू वेंडी चेन हिच्याविरुद्ध खेळेल तर रितुपर्णला आठव्या मानांकित जपानच्या नात्सुकी निदायरा हिचे आव्हान मोडित काढावे लागेल. साई उत्तेजिता राव चुक्का व श्रीकृष्णप्रिया कुदरावल्ली यांना पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या खेळाडूंशी सामना करावा लागेल. पुरुष दुहेरीत मनू अत्री व बी.सुमिथ रेड्डी यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे तसेच अर्जुन एमआर व रामचंद्रन श्लोक यांना या स्पर्धेत खेळून आपल्या अनुभवात भर घालता येणार आहे. याखेरीज फ्रान्सिस ऑल्विन कोणा व के. नंदगोपाळ, रोहन कपूर व शिवम शर्मा (पुरुष दुहेरी), मेघना जक्कमपुडी व एस. राम पूर्विशा, रोहन कपूर व कुहू गर्ग (मिश्र दुहेरी). प्रणव जेरी चोप्रा व एन. सिक्की रेड्डी यांच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.