भारताचा गुणेश्‍वरन १७६व्या स्थानी

0
144

भारताच्या प्रजनेश गुणेश्‍वरन याने काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत ८४ क्रमांकांची मोठी झेप घेताना कारकिर्दीतील सर्वोत्तम १७६वे स्थान मिळविले आहे. रविवारी एटीपी चॅलेंजर सर्किटमधील विजेतेपदामुळे प्रजनेशला प्रगती साधणे शक्य झाले आहे. चीनमधील रविवारच्या जेतेपदानंतर प्रजनेशने १२५ गुणांची कमाई केली. यामुळे आपल्या कारकिर्दीत त्याने प्रथमच ‘टॉप २००’मध्ये स्थान प्राप्त केले. पुरुष एकेरीत युकी भांब्री भारताचा सर्वोत्तम स्थानावरील खेळाडू असून दोन स्थानाच्या घसरणीसह तो ८५व्या क्रमांकावर पोहोचला आहे. यानंतर रामकुमार रामनाथन (१२०,- ५) याचा क्रमांक लागतो. सुमीत नागल (२२५वे स्थान, -६), अर्जुन काढे (३९७, + १) व शशी कुमा मुकुंद (४१८, + ९८) हे ‘अव्वल ५००’मधील अन्य भारतीय आहेत.

पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा एका स्थानाच्या घसरणीसह २३व्या तर दिविज शरण दोन स्थानांच्या नुकसानासह ४३व्या क्रमांकावर आहे. लिएंडर पेसची घसरण सुरूच असून या आठवड्यात तो ५०व्या क्रमांकावर आहे.
डब्ल्यूटीए क्रमवारीत अंकिता रैना हिने दोन क्रमांकांची उडी घेत १९३वे स्थान आपल्या नावे केले आहे. करमन कौर थंडी २६७व्या स्थानी आहे. दुहेरीत सानिया मिर्झा २४व्या स्थानी कायम असून सोळा स्थानांचा तोटा झाल्याने प्रार्थना ठोंबरे १६४व्या स्थानी पोहोचली आहे.

एटीपी टॉप १० ः १. राफेल नदाल (स्पेन, ८७७०), २. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड, ८६७०), ३. आलेक्झांडर झ्वेरेव (जर्मनी, ५१९५), ४. मरिन चिलिच (क्रोएशिया, ४९८५), ५. ग्रिगोर दिमित्रोव (बल्गेरिया, ४९५०), ६. युआन मार्टिन डेल पोत्रो (अर्जेंटिना, ४४७०), ७. डॉमनिक थिएम (ऑस्ट्रिया, ३५४५), ८. केविन अँडरसन (द. आफ्रिका, ३३९०), ९. जॉन इस्नर (अमेरिका, ३१२५), १०. डेव्हिड गॉफिन (बेल्जियम, ३०२०)
डब्ल्यूटीए टॉप १० ः १. सिमोना हालेप (रोमानिया, ८०५५), २. कॅरोलिन वॉझनियाकी (डेन्मार्क, ६७९०), ३. गार्बिन मुगुरुझा (स्पेन, ६०६५), ४. इलिना स्वितोलिना (युक्रेन, ५४५०), ५. येलेना ओस्टापेंको (लाटविया, ६३८०), ६. कॅरोलिना प्लिस्कोवा (झेक प्रजासत्ताक, ५१००), ७. कॅरोलिन गार्सिया (फ्रान्स, ४७००), ८. व्हीनस विल्यम्स (अमेरिका, ४२७६), ९. स्लोन स्टीफन्स (अमेरिका, ३९३९), १०. पेट्रा क्विटोवा (झेक प्रजासत्ताक, ३२७१)