मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावरील उपचाराचा शेवटचा टप्पा १५ मेपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर ते गोव्यात परतणार असल्याचे भाजपने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे १३ मे रोजी आयोजित ताळगाव येथील भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सभेला त्यांना मुकावे लागणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्याचे ओएस्डी उपेंद्र जोशी अमेरिकेत दाखल झाले असून पुढील १५ ते २० दिवस ते अमेरिकेत राहणार आहेत. कामकाजासंबंधी काही महत्त्वाच्या फाईली त्यांनी सोबत नेल्या आहेत.
आजारपणामुळे उपचारासाठी अमेरिकेत गेलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे तेथून प्रशासनाचा कारभार सांभाळत असून ह्या कामी त्यांना त्यांचे ओएसडी उपेंद्र जोशी हे मदत करणार आहेत. जोशी हे पर्रीकर यांना चालू असलेले विविध प्रकल्प, भावी प्रकल्प व सरकारी योजनांची सध्याची स्थिती व प्रगती याविषयी माहिती देतील.