>> तीन आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश
गोवा डेअरीच्या घोटाळ्याची चौकशी शुक्रवारी सकाळपासून यतिश वेर्णेकर यांनी सुरु केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात डेअरीतील सत्य उघड होण्याची प्रतीक्षा दूध उत्पादक करीत आहे.
सहकार निबंधकांनी गोवा डेअरीची चौकशी करण्यासाठी यतिश वेर्णेकर यांची नियुक्ती केली असून येत्या तीन आठवड्यात चौकशी पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार शुक्रवारी नवसो सावंत, राधिका काळे, डॉक्टर धुरी व अन्य विभागाच्या अधिकार्यांची चौकशी करण्यात आली.
यतिश वेर्णेकर यांनी पत्रकारांशी बोलताना चौकशी दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात येणार असून डेअरीचे अधिकारी चौकशीला चांगले सहकार्य करीत असल्याचे सांगितले. डेअरीला लागणारे साहित्य तसेच यंत्राच्या खरेदीसंबंधी सर्व चौकशी करणार असल्याचे वेर्णेकर यांनी सांगितले. नवसो सावंत यांनी चौकशी करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांनी काही कागदपत्रे मागवून घेतली असून अधिकार्याकडून सर्व सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.