खांडेपारमध्ये बंगल्यावर दरोडा घालून कारसह ऐवज पळवला

0
110

खांडेपार येथील बाबुली गावकर यांच्या बंगल्यात घुसून गुरुवारी पहाटे ३ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास ४ अज्ञात दरोडेखोरानी कारसह सोन्याचे दागिने पळविले. चेहर्‍यावर बुरखा घालून दरोडेखोरांनी खिडकीचे ग्रिल्स तोडून बंगल्यात प्रवेश करून ही चोरी केली असून फोंडा पोलीस याप्रकरणी तपास करीत आहे.

पहाटे ३ ते ४.३० वाजण्याच्या सुमारास बाबुली गावकर यांच्या बंगल्यातील खिडकीचे ग्रिल्स तोडून दरोडेखोरांनी तोडून आत प्रवेश केला. दरोडेखोरांनी झोपलेल्या पती पत्नींला उठवून बांधून ठेवल्याने ते काहीच प्रतिकार करू शकले नाही. दरोडेखोरांनी कपाटात ठेवलेले सोन्याची साखळी, अंगठ्या, दोन मोबाईल, लॅपटॉप व रोख २१ हजार रुपयांसह पार्क केलेली कारही चोरून नेली. सकाळी स्वतःची सुटका करून घेऊन पती पत्नीने शेजार्‍यांना माहिती दिल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. बाबली गावकर हे उसगाव येथील मार्क कंपनीत सहायक व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. पोलीस अधीक्षक अरविंद गावस, उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक हरीश मडकईकर यांनी बंगल्यात जाऊन पाहणी केली.

बंगल्यावर दरोडा पडल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. फोंडा पोलिसांनी श्‍वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपासणी केली.