- शैलेंद्र देवळाणकर
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने आण्विक विकासाचा कार्यक्रम थांबवण्याचे घोषित केल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कोरियन द्विपखंडावर आणि पर्यायाने जगावर घोंगावणारे युद्धाचे ढग विरले आहेत. भविष्यातील अणुकार्यक्रम थांबवण्याची घोषणा किमने केली असली तरी सध्याचा संहारक अस्रांचा साठा नष्ट केला जाणार नाही. त्यामुळे जगापुढील धोका कायमचा टळलेला आहे, असे ठामपणाने म्हणता येणार नाही.
अखेर संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास टाकला, कारण गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये – कोरियन द्वीपखंडामध्ये- प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली होती. या भूप्रदेशातील सर्वांचेच जीव धोक्यात आले होते, कारण उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन या विक्षिप्त आणि अतिरेकी विचारांच्या हुकुमशहाकडून सातत्याने अण्वस्रांचे परीक्षण, क्षेपणास्र चाचण्या, हायड्रोजन बॉम्ब चाचणी अशा संहारक अस्रांची निर्मिती करून अमेरिकेसारख्या महासत्तेवर हल्ला करून या देशाला उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. दक्षिण कोरियालाही बेचिराख करून टाकण्याच्या धमक्या किमने दिल्या होत्या. त्यातून संपूर्ण जगभरातच चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशा धमक्या देऊन सातत्याने वातावरण तापवत ठेवून जगभरामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमने आता थेट यू टर्न घेतला आहे. किमने उत्तर कोरिया भविष्यामध्ये अण्वस्रांचा विकास करणार नाही, अणुपरीक्षण करणार नाही असा निर्णय जाहीर केला आहे. त्याच्या या निर्णयाचे जगभरातून स्वागत होत आहे. असे असले तरी टोकाच्या अतिरेकी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या आणि अन्न, वस्त्र, निवार्यासारख्या मूलभूत गोष्टींपासून वंचित असणार्यांची कमाल संख्या असणार्या उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेला डबघाईला आणणार्या किमने अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे संभ्रमही निर्माण झाला आहे.
तसे पाहता, उत्तर कोरिया हा जागतिकदृष्ट्या प्रभावी देश म्हणून गणला जात नाही. असे असताना ‘टाइम्स’ मासिकाने जाहीर केलेल्या जगभरातील सर्वांत प्रभावी व्यक्तींच्या ताज्या यादीमध्ये किमचे नाव पहिल्या शंभरांमध्ये समाविष्ट झाले आहे. ही गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. जागतिक पटलावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी केवळ अणुपरीक्षणे आणि धमक्या देऊन किम थांबला नाही तर त्याने दोन वेळा क्षेपणास्रे डागून जगातील अनेकांचा काळजाचा ठोकाही चुकवला! अमेरिकेने उत्तर कोरियावर हल्ल्याची तयारी चालवल्याचे वृत्त प्रसारित होताच किमने त्यांच्या दिशेने एक क्षेपणास्र डागले होते; दुसरीकडे एक क्षेपणास्र दक्षिण कोरियावरुन डागण्यात आले होते. त्यामुळे परिस्थिती कमालीची स्ङ्गोटक बनली होती. अशा या माथेङ्गिरू म्हणवल्या जाणार्या हटवादी हुकुमशहाने एकाएकी बॅकङ्गूटवर जाण्याचा निर्णय का घेतला हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
किमच्या बदललेल्या धोरणाची कारणमीमांसा करताना काही प्रमुख मुद्दे समोर येतात –
१) सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, उत्तर कोरियाकडून आगामी काळात अणुपरीक्षण करणार नाही, अण्वस्रांचा विकास करणार नाही अशी घोषणा पहिल्यांदा झालेली नाही. १९९४, २००५ आणि २०१२ अशा तीनही वर्षी उत्तर कोरियाकडून अशा स्वरुपाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या; परंतु त्यांचे पालन करण्यात आले नाही. याचे कारण प्रत्येक वेळी अशा घोषणांच्या माध्यमातून सौदेबाजीचे राजकारण झालेले होते. उत्तर कोरिया हा अण्वस्रांचा वापर सौदेबाजीचे साधन म्हणून करत आला आहे. अणुपरीक्षण, क्षेपणास्र चाचण्यांच्या माध्यमातून युद्धाच्या, हल्ल्याच्या धमक्या द्यायच्या, युद्धजन्य परिस्थिती निर्माण करायची आणि नंतर सौम्य धोरण स्वीकारण्यासाठी भरभक्कम पैसे घ्यायचे अशा प्रकारची सौदेबाजी उत्तर कोरिया नेहमीच करत आला आहे. आण्विक कार्यक्रम थांबवण्याचे आश्वासन देताना आपल्यावर लादलेले आर्थिक निर्बंध उठवण्यातही उत्तर कोरिया नेहमीच यशस्वी झाला आहे. ज्या ज्या वेळी ही सौदेबाजी ङ्गिसकटते किंवा ठरलेली मदत रक्कम मिळण्यास विलंब लागतो, त्या – त्या वेळी उत्तर कोरियाकडून पुन्हा अणुपरीक्षण केले जाते. गेल्या दोन दशकांमध्ये अशाच प्रकारे उत्तर कोरिया ब्लॅकमेलिंगचे राजकारण करत आलेला आहे. त्यामुळे आता केलेली किमची घोषणा कायमस्वरुपी टिकेल याबाबत शाश्वती देता येणार नाही.
२) उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था आणि या देशाचा हुकुमशहा किम यांना नियंत्रित करू शकणारा जगाच्या पाठीवर केवळ एक देश आहे, तो म्हणजे चीन. उत्तर कोरिया आणि चीन यांच्या सीमारेषा परस्परांना भिडलेल्या आहेत. उत्तर कोरियाचा ८५ टक्के व्यापार एकट्या चीनबरोबर होतो. त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघटनेने अणुपरीक्षणाच्या कारणांवरून उत्तर कोरियावर बहिष्कार टाकलेला असला तरीही तो आर्थिक बहिष्कार यशस्वी होत नाही, याचे कारणही चीनशी जोडलेले आहे. या निर्बंधांच्या काळातही उत्तर कोरियाचा चीनशी असणारा छुपा व्यापार कायम राहतो. किमने सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर केवळ आणि केवळ चीन या एका देशालाच भेट दिलेली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये चीन नेहमीच मध्यस्थीच भूमिका बजावत आला आहे. २००५ मध्ये अशाच प्रकारे उत्तर कोरियाने युद्धखोरीची भाषा सुरू केली होती तेव्हाही चीननेच मध्यस्थी केली होती. आताही किम जोंग उनची मागील महिन्यामध्ये चीन येथे शी जिनपिंग यांच्यासमवेत एक गुप्त बैठक झाली आणि या बैठकीदरम्यान चीननेच मध्यस्थीची भूमिका बजावली असणार आहे.
३) किम जोंग उन याला एका गोष्टीची स्पष्ट जाणीव आहे की, तो एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच अशा स्वरुपाच्या धमक्या देऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये किमने अण्वस्रांचा वापर केला नसता, कारण दक्षिण कोरिया अथवा जपानविरोधात किमने अण्वस्रांचा वापर केला असता तर अमेरिकेकडून जोरदार प्रतिहल्ला उत्तर कोरियावर करण्यात आला असता, कारण या दोन्ही देशांच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेकडे आहे. अमेरिकेने हल्ला केला असता तर किमची सत्ता संपुष्टात आली असती. त्यामुळे किम हा धूर्त स्वरुपाचा हुकुमशहा आहे. त्याने केवळ हल्ल्यांच्या वल्गना केल्या होत्या. त्याला केवळ यातून पैसे लाटायचे होते. अमेरिकेने उत्तर कोरियासोबत चर्चेची तयारीही दाखवल्यामुळे वातावरण बदलले होते. म्हणूनच एक विशिष्ट परिस्थिती तयार झाल्यानंतर किमने यू टर्न घेतला.
४) येणार्या काही दिवसांत उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्या दरम्यान शिखर परिषद होणार आहे. त्याचप्रमाणे मे महिन्याच्या शेवटी डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांची परस्पर चर्चा होणार आहे. या चर्चेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याचे प्रत्यंतर ट्रम्प यांनी चर्चेस तयारी दर्शवल्यानंतर काही दिवसांतच किमने अणुपरीक्षण थांबवण्याचा निर्णय घेतल्याने आले आहे. ट्रम्प – किम चर्चेसाठीची पोषक वातावरणनिर्मिती यातून करण्यात आली आहे.
५) उत्तर कोरिया हा कमालीचा डबघाईला आलेला देश आहे. तेथील लोकांचे जीवनमरणाचे प्रश्न बिकट बनलेले आहेत. असे असतानाही उत्तर कोरिया एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर अण्वस्रांच्या विकासावर पैसा खर्च करत होता. उत्तर कोरियाची जनता हे का सहन करत होती, असा प्रश्न निर्माण होतो. याच्या उत्तराचा शोध घेतला असता असे लक्षात येते की किम जोंग उन याने अण्वस्रांच्या कार्यक्रमातून दोन प्रकारचे संदेश त्यांच्या लोकांना दिले. अण्वस्रांच्या माध्यमातून मी तुमचे रक्षण करू शकेन, हा यातील पहिला संदेश होता. दुसरा संदेश म्हणजे, आजवर उत्तर कोरिया हा एक प्रकारे वाळीत टाकलेला देश होता; मात्र अण्वस्रांमुळे या छोट्या देशाच्या प्रमुखाला जागतिक महासत्ता असणार्या अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरिया या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी समोरासमोर चर्चा करण्याचा सन्मान मिळाला. ही किमची महत्त्वाकांक्षा होती. अण्वस्रांमुळे त्याच्या या अहंगंडाला किंवा ‘इगो’ला खतपाणी मिळाले. किम हा अत्यंत चाणाक्ष सत्ताधीश आहे. त्याने हा यू टर्न आताच घेण्याचे कारण म्हणजे एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त काळ त्याने अणुपरीक्षणाचा कार्यक्रम सुरू ठेवला असता तर तेथील जनता उठाव करण्याची शक्यता होती; पण त्याने ती वेळ येण्याआधीच सौदेबाजीत यश मिळवले. तसेच या माध्यमातून त्याने स्वतःचे जनसमर्थनही वाढवून घेतले. दक्षिण कोरियाकडून हल्ल्याची काल्पनिक भीती निर्माण करून त्यापासून मी तुमचे रक्षण केले आहे, असा समज जनतेच्या मनात निर्माण करण्यात आणि त्याचबरोबर आपल्या देशाचे महत्त्व वाढवल्याचे दाखवून देत किम जोंग उनने ही खेळी यशस्वी केली आहे.
कोणत्याही अनियंत्रित हुकुमशहापुढे केवळ अंतर्गत आव्हान नसते, तर त्याला जागतिक पटलावर एक विशिष्ट प्रतिमा निर्माण करावी लागते. किमनेही आता तसा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळेच त्याने आता संपूर्ण कोरियन द्वीपखंड अण्वस्रमुक्त करण्याची इच्छा प्रतिपादित केली आहे. यातून आपण अण्वस्र प्रसाराच्या विरोधात असून उदारमतवादी आहोत अशा स्वरुपाची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
ही सर्व कारणमीमांसा एका बाजूला असली तरी किमच्या या खेळीमुळे, सौदेबाजीतील यशामुळे जगापुढील संकट खरोखरच टळले आहे का हा प्रश्न शिल्लक राहतो. याचे कारण अशा घोषणा यापूर्वी उत्तर कोरियाकडून झालेल्या आहेतच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भविष्यात अणुविकासाचा कार्यक्रम राबवणार नसल्याचे किमने स्पष्ट केले असले तरी आताच्या घडीला असणारी अण्वस्रे, आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्रे, हायड्रोजन बॉम्ब, रासायनिक शस्रास्रे हे सर्व नष्ट करण्याचा कोणताही उल्लेख त्याने केलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतरही उत्तर कोरियावरील आर्थिक निर्बंध उठवल्याची आणि या देशाला गरीबीचा सामना करण्यासाठी भरघोस आर्थिक मदत देण्याची घोषणा होईल; मात्र सध्या असणारा विनाशकारी शस्रास्रांचा साठा हा उत्तर कोरियाकडे कायम राहणार आहे. त्यामुळे जगाच्या डोक्यावर असणारी टांगती तलवार यापुढेही कायमच राहणार आहे.