राज्यातील सर्वाधिक दुधाचे उत्पादन करणार्या गावांचा दुग्ध ग्राम योजनेखाली विकास केला जाणार आहे. तसेच सर्वसामान्य वर्गातील बेरोजगार युवकांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून १० जनावरांच्या खरेदीसाठी ९० टक्के अनुदान दिले जाणार आहे.
पशुसंवर्धन खात्याने कामधेनू (सुधारित) योजनेची अधिसूचना जारी केली आहे. राज्यातील दुधाच्या उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने कामधेनू (सुधारित) योजनेमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. यात सर्वसामान्य गटासाठीच्या अनुदानात आणखीन ५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच गाय किंवा म्हैस खरेदीसाठीची रक्कम ७० हजार रुपये करण्यात आली आहे.
राज्यातील दुधाच्या उत्पादनात वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दूध ग्राम गाव म्हणून निवड करण्यात येणार्या गावातील दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी खास साधन सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. गोवा दूध उत्पादक संघ किंवा इतर मान्यता प्राप्त संस्थेला सर्वाधिक दुधाचा पुरवठा करणार्या गावांचा दूध ग्राम गाव योजनेसाठी निवड केली जाणार आहे. संकरित जनावरे, म्हैस, सहीवाल, गीर आणि रेड सिंधी गायीच्या खरेदीसाठी योजनेखाली मान्यता देण्यात आली आहे.
सुधारित कामधेनूमध्ये जनावराच्या खरेदीची रक्कम ६० हजारावरून ७० हजार रुपये करण्यात आली आहे. तसेच सर्वसामान्य गटासाठी अनुदान ७५ टक्क्यांवरून ८० टक्के करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, जमाती, धनगर समाजातील नागरिकांना ९० टक्के अनुदान कायम ठेवण्यात आले आहे. सर्वसामान्य गटातील बेरोजगार युवकाला १० जनावरांच्या खरेदीसाठी ९० टक्के अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. बेरोजगार युवकांनी दूध व्यवसायाकडे वळविण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. या योजनेखालील अनुदान लाभार्थीच्या थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहे. दूध उत्पादक शेतकर्याला वैज्ञानिक पद्धतीने गोठा बांधण्यासाठी ८० टक्के अनुदान दिले जाणार आहे. गोठ्यासाठी बांधकाम खर्च ६ हजार रुपये प्रति चौरस मीटर दराने दिले जाणार आहे. १० जनावरांसाठी ५४ चौरस मीटर आणि २० जनावरांसाठी १०८ चौरस मीटर गोठा बांधणे आवश्यक आहे. ५४ चौरस मीटर गोठ्यासाठी ३ लाख २४ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातील २ लाख ५९ हजार २०० रुपये अनुदानाच्या स्वरूपात मिळणार आहेत. तर १०८ चौरस मीटरच्या गोठ्यासाठी ६लाख ४८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.