>> आयपीएल फ्रेंचायझींवर बीसीसीआयची बंधने
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याची क्षमता असलेल्या २३ खेळाडूंच्या आयपीएलमधील कामगिरीवर तसेच त्यांच्या कार्यभारावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या केंद्रीय करारबद्ध खेळाडूंच्या यादीत नसलेल्यांचा या २३ खेळाडूंमध्ये समावेश आहे. अंडर १९ विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ व वेगवान गोलंदाज शिवम मावी, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा जमवणारा मयांक अगरवाल यांचा या यादीत समावेश आहे. निवडण्यात आलेल्या खेळाडूंची कामगिरी पाहून त्यांना भविष्यात भारत ‘अ’ किंवा राष्ट्रीय संघात स्थान देण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. २३ खेळाडूंची तीन गटात विभागणी करण्यात आली आहेत. अंडर १९ संघातील खेळाडू, मागील ३-४ वर्षांत अंडर १९ क्रिकेट खेळलेले खेळाडू व भारत ‘अ’कडून खेळलेले, असे हे गट आहेत. युवा गोलंदाज शिवम मावी व नवदीप सैनी आपापल्या फ्रेंचायझीचे नियमित सदस्य नसल्याने त्यांच्याकडून नेट्समध्ये इतर नियमित सदस्यांसाठी ६० ते १०० चेंडू टाकण्यास फ्रेंचायझींकडून सांगण्यात येऊ शकते.
परंतु, आता असे करण्यास बंधने घातली जाणार आहेत. भुवनेश्वर कुमारसारखे किंवा केंद्रीय करारात असलेले खेळाडू अनुभवी आहेत. त्यांमुळे त्यांना त्यांची मर्यादा माहीत असते. पण, मावी, नवदीप किंवा अवेश खानसारखे युवा खेळाडू अननुभवी असल्याने अतिरिक्त सरावासाठी त्यांचा वापर फ्रेंचायझींकडून केला जाऊ शकतो. भारतीय क्रिकेट संघाचे भरगच्च वेळापत्रक व भविष्याचा विचार करून फ्रेंचायझीस्तरावर खेळाडूंचा अतिवापर टाळण्यासाठी बीसीसीआयने हे मोठे पाऊल उचलल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकार्याने सांगितले आहे. त्यामुळे फ्रेंचायझींच्या सराव सत्रावेळी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे ट्रेनर व फिजियो उपस्थित राहणार आहेत. २३ खेळाडूंना देण्यात येणार्या जबाबदारीचा नियमित अहवाल फ्रेंचायझींना बीसीसीआयला द्यावा लागणार आहे. बंगालचा अभिमन्यू ईश्वरनचादेखील या यादीत समावेश करण्यात आला असून आयपीएलमध्ये तो खेळत नसला तरी भारत ‘अ’ संघाच्या आगामी इंग्लंड दौर्यात त्याचा विचार होऊ शकतो.
खेळाडूंची नावे ः विद्यमान अंडर १९ ः पृथ्वी शॉ, शुभमन गिल, शिवम मावी व कमलेश नागरकोटी.
माजी अंडर १९ ः ईशान किशन, ऋषभ पंत, अवेश खान, खलिल अहमद व संजू सॅमसन.
देशांतर्गत भारत अ ः श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, विजय शंकर, जयदेव उनाडकट, बासिल थम्पी, दीपक हुडा, मयांक अगरवाल, रविकुमार समर्थ, नवदीप सैनी, सिद्धार्थ कौल, हुनुमा विहारी व अंकित बावणे.