अण्णांच्या दबावापुढे सरकार हतबल

0
77

अण्णांच्या अटकेमुळे काल देशभर निदर्शने सुरूच राहिली. संसदेतही तीव्र प्रतिसाद उमटले व सरकार पक्षाची पुरती कोंडी होऊन बसली. या पार्श्वभूमीवर अण्णांशी बोलणी करणार्‍या दिल्ली पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्यात अण्णा आपल्या मुद्द्यावर ठाम राहिल्याने दबावाची तीव्रता वाढतच गेली. अटी शिथील करण्यास मागे पुढे करताना दिल्ली पोलिसांनी सुरुवातीस सात दिवस उपोषणास परवानगी देण्याचे मान्य केले. मात्र अण्णांनी निदान एक महिन्याची तरी परवानगी हवी असा आग्रह धरला. शेवटी रामलीला मैदान हे स्थळ व एकवीस दिवस उपोषणास परवानगी असा प्रस्ताव पोलिसांनी मांडला. यावर अण्णांचा पक्ष सहमत झाल्याचे कळते.

बोलण्यांमध्ये अण्णांचाच विजय होईल याबाबत सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये विश्‍वास होता. काल सकाळीच स्वामी अग्नीवेश व मेधा पाटकर यांनी समर्थकांना संबोधित करताना सांगितले होते की, अण्णा कोणत्याही क्षणी बाहेर पडतील, सर्वांनी जेपी पार्कमध्ये जाण्याची तयारी करावी.

मात्र अण्णांनी सरकारची कोंडी करण्याची योजना पूर्णपणे आखली होती. त्यांनी सहकारी किरण बेदी, प्रशांत भूषण व मनीष सिसोदिया यांना बोलावून रणनिती व्यवस्थित आखली. त्यानंतर किरण बेदी बाहेर आल्या व उपस्थितांना म्हणाल्या की चर्चा सुरूच आहे, अण्णा इतक्या लवकर बाहेर पडणार नाहीत. त्यानंर दिल्ली पोलीस व अण्णा यांच्या चर्चा सुरू झाली. सुरूवातीस दिल्ली पोलिसांनी सात दिवस परवानगी देण्याचे मान्य केले व प्रत्येक दिवशी परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल असा प्रस्ताव ठेवला. समर्थकांच्या मर्यादित संख्येची अट रद्द करताना पोलिसांनी सांगितले की कितीही आंदोलक उपोषणाच्या स्थळी जमू शकतात. याशिवाय पोलिसांनी जेपी पार्कऐवजी अण्णांना रामलीला मैदानावर उपोषण करता येईल, असेही मान्य केले. हजारे याच ठिकाणी सुरुवातीस उपोषण करू पाहत होते मात्र पोलिसांनी त्यांना दिल्लीबाहेरची जागा घेण्यास सांगितले होते. यानंतर वादाचा विषय उरला होता तो म्हणजे उपोषणांच्या दिवसांचा. अण्णांनी आग्रह धरला की त्यांना किमान ३० दिवसांची उपोषणाची परवानगी मिळाली पाहिजे. पोलिसांनी त्यानंतर दिवस १४ करण्याचे मान्य केले व शेवटी ते २१ दिवसांच्या प्रस्तावापर्यंत आले.

कायदा सुव्यवस्थेसाठी अण्णांना अटक : पंतप्रधान

सरकार शांती कायम राखण्यास बांधील आहे, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी काल संसदेत सांगितले. कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठीच दिल्ली पोलिसांना अण्णांना अटक करणे भाग पडले असे ते म्हणाले. अण्णांच्या अटकेविषयी पंतप्रधानांनी सभागृहात वक्तव्य करावे अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरल्यामुळे त्यांना बोलणे भाग पडले.

ते म्हणाले, अण्णांचा आग्रह आहे की त्यांनी तयार केलेले लोकपाल विधेयकच संमत केले जावे. अण्णांची सुटका करण्यात आली आहे मात्र त्यांनी तुरुंगातून बाहेर येण्यास नकार दिला आहे. या देशातील प्रत्येकाला शांततामयरितीने विरोध प्रदर्शित करण्याचा हक्क आहे मात्र त्याची एक पद्धत असते. अण्णांची मागणी अपरिपक्व व संसदीय लोकशाही प्रणालीवर विपरित परिणाम करणरी आहे. लोकपाल विधेयक संमत झालेच पाहिजे मात्र कायदा कोणी करावा हा वादाचा नवीन विषय बनला आहे. ‘परवाचा प्रकार पुन्हा होणार नाही अशी प्रामाणिक अपेक्षा आहेअसे सांगून त्यांनी आवाहन केले की सर्वांनी सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी सहकार्य करावे. संसदेत अनेक महत्त्वाची विधेयके संमत करायची असून ती खोळंबून राहिल्यास जनतेवर अन्याय केल्यासारखे होईल. पंतप्रधानांनी आपले वक्तव्य लोकसभा व राज्यसभा दोन्ही ठिकाणी वाचून दाखवले. ते बोलताना विरोधकांनी चढ्या आवाजात टिप्पणी करायला सुरूवात केल्यामुळे वारंवार त्यांचे बोलणे खंडित होत होते.

अभाविपचा आज महाविद्यालयीन बंद

अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज गुरुवार दि. १८ रोजी देशभर महाविद्यालयीन बंदचे आवाहन केलेले असून गोव्यातीलही सर्व महाविद्यालयेही बंद ठेवण्यात येतील, तसेच सर्व तालुक्यातून विद्यार्थी मोर्चे काढतील, असे अभाविपचे संघटनमंत्री अभय भिडे यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पणजीत सकाळी ९.३० वा. आझाद मैदानावरून सुमारे ५०० महाविद्यालयीन विद्यार्थी पणजी शहरात मोर्चा काढतील, अशी माहिती त्यांनी दिली.

अण्णा हजारे यांना अटक करण्याची जी कृती संपुआ सरकारने केलेली आहे तिचा अभाविप तीव्र निषेध व धिक्कार करीत असल्याचे अभय भिडे यांनी पुढे सांगितले. शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने चालणारे आंदोलन चिरडून टाकून सरकारने हुकूमशाही वृत्तीचे दर्शन घडवले आहे, असे सांगून सध्या चालू असलेल्या आंदोलनाचे अभाविप पूर्णपणे समर्थन करीत असल्याचे भिडे यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचाराच्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज दाबून टाकण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याचे परिणाम केंद्राला भोगावे लागतील, असा इशाराही अभाविपने दिला आहे.

रामदेव बाबा, श्री रविशंकर भेटीस

काल सकाळपासून अण्णांच्या समर्थकांनी व लोकांनी मोठ्या प्रमाणात तिहार कारागृहाबाहेर गर्दी केली होती. हातात तिरंगा ध्वज घेऊन ते घोषणाबाजी करत होते. अण्णा बाहेर येईपर्यंत तिथून हटण्यास त्यांनी नकार दिला.

छत्रसाल स्टेडियमबाहेरही काल सलग दुसर्‍या दिवशी अण्णा समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. सध्याकाळी इंडिया गेट परिसरातही लोकांनी निदर्शने केली. देशभरातही ठिकठिकाणी निदर्शने केली.

योगगुरु बाबा रामदेव व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी काल अण्णा हजारे यांनी तिहार कारागृहात जाऊन भेट घेतली.

बाबा रामदेव यांनी तिहार येेथे जमलेल्या अण्णा समर्थकांना संबोधित केले. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना निवेदन दिले असून अण्णांना केलेल्या अटकेचा निषेध केल्याचे ते म्हणाले.

मडगावात मेणबत्ती मोर्चा

लोकपाल विधेयक आणण्यासाठी तसेच भ्रष्टाचार हटावे लोकतंत्र बचावोया राष्ट्रव्यापी मोहिमेचा भाग म्हणून मडगाव येथे समविचारी लोकांनी मडगाव शहरात मेणबत्त्या पेटवून रॅली काढली. यात कॉलेज विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग होता. शर्मद पै रायतुरकर, लावरेल आंब्रार्जीस यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका इमारतीपासून सायंकाळी ६.३० वाजता रॅली सुरू झाली.

ही रॅली नगरपालिका उद्यानाला वळसा घालून ज्योती प्लाझा हॉटेलाजवळून बाजारात व तेथून पिंपळकट्‌ट्यावरून जुने मासळी मार्केट, वूडलँड हॉटेलाजवळून पोलीस स्टेशनसमोरून लोहिया मैदानावर गेली व तेथे डॉ. राय मनोहर लोहिया जवळ थांबून त्यांनी भ्रष्टाचाराचा निषेध केला. लोहिया मैदानावर आवदा व्हिएगश, शर्मद पै रायतूरकर आदींनी बोलताना भ्रष्टाचाराचा निषेध केला. गोव्यातील जनता भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांच्या पाठिशी खंबीरपणे राहणार असल्याची प्रतीज्ञा केली.

म्हापशात मशाल मिरवणूक

जनलोकपाल विधेयकासाठी आंदोलन करणार्‍या अण्णा हजारेंना अटकेच्या निषेधार्थ काल म्हापसा शहरातील लोकांनी म्हापसा टॅक्सी स्थानकावर जाहीर निषेध सभा घेऊन नंतर म्हापसा शहरात मशाल मिरवणूक काढली. मिरवणुकीत म्हापसा शहर तसेच आजूबाजूच्या गावातील त्याचप्रमाणे पणजी, डिचोली व इतरत्र ठिकाणहून अण्णा हजारे यांचे समर्थक सहभागी झाले होते. संध्याकाळी ५ वा. म्हापसा टॅक्सी स्टॅण्डवर जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेत भैय्या देसाई, सुनील पेडणेकर, संजय नाईक, जॉर्ज फर्नांडिस, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत, वल्लभ केळकर, तुषार टोपले, स्वाती केरकर, राजेश धारगळकर, ऍड. बाबुसो गावकर, श्री. काणेकर व इतर नागरिकांची भाषणे झाली. अण्णा हजारे उपोषणाला बसणार होते तेव्हा त्यांना अटक केली. त्याच्या निषेधार्थ गोव्यातच नव्हे तर संपूर्ण भारतभर सरकार निषेधार्थ सभा, आंदोलने, निषेध सभा घेऊन सरकारच्या विरोधात आवाज उठविला जात आहे. याचाच एक भाग म्हणून म्हापसा शहरात ही निषेध सभा आयोजित केली होती. या सभेला सुमारे ३०० हून अधिक अण्णा समर्थक उपस्थित होते.