संसदेचे कामकाज झालेले भाजपलाच नको ः कॉंग्रेस

0
85

विरोधी पक्षानी संसदेत कामकाज होऊ दिले नाही हा भाजपचा आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या…’ असा प्रकार आहे, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

वास्तविक भाजपलाच संसदेचे कामकाज झालेले नको आहे बँकांचे हजारो कोटी रु. लुटून निरव मोदी विदेशात पळून गेला. अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्याकडे प्रचंड मालमत्ता कशी आली, बँकांना गंडा घालून विदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्यास सरकारला अपयश का आले या विरोधकांच्या प्रश्‍नांची सरकारकडे उत्तरे नाहीत. आणि म्हणून त्यांनाच संसदेचे कामकाज झालेले नको होते आणि त्याच्यासाठी भाजपच्याच खासदारांनी संसदेचे कामकाज होऊ नये यासाठी रोज संसदेत नाटके केली, असा आरोप नाईक यांनी केला.

भाजपची सत्ता असलेल्या छत्तीसगढ येथे करोडों रु. चा अन्नधान्य घोटाळा झालेला आहे. मध्यप्रदेश येथे व्यापम घोटाळा झालेला आहे. देशभरात तीन कोटी लोक बेरोजगार आहेत. विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोकर्‍या गेलेल्या आहेत. अमित शहा यांच्यावरील खटल्याचे कामकाज पाहणार्‍या न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे. तसेच त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या २९ दिवसांनी अमित शहा यांची खटल्यातून निर्दोष मुक्तता झालेली आहे. या सर्व प्रश्‍नांवरील चर्चेस भाजप नेतृत्वाखालील सरकार घाबरत आहे. आणि सरकारनेच संसदेचे कामकाज होऊ नये यासाठी अधिवेशनाच्या वेळी षडयंत्र रचल्याचा आरोप शांताराम यांनी केला आणि आता विरोधकांनी कामकाज करू दिले नाही असा आरोप करून उपोषण करणे म्हणजे उलटा प्रकार असल्याचे नाईक म्हणाले.