४९ खाण आंदोलकांना अटकपूर्व जामीन मंजूर

0
113

येथील कदंब बसस्थानकाजवळ १९ मार्च २०१८ रोजी खाण अवलंबिताच्या आंदोलनाला हिंसक वळण प्रकरणातील ४९ संशयितांना बाल न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करून काल दिलासा दिला.
या प्रकरणातील संशयितांनी तीन दिवस पोलीस स्टेशनवर हजेरी लावावी. संशयितांना अटक केल्यानंतर त्यांची १० हजार रुपयांच्या हमीवर सुटका करावी, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांना समन्स बजावले होते.

येथील कदंब बसस्थानकाजवळ खाण अवलंबितांनी १९ मार्च २०१८ रोजी केलेल्या आंदोलनाच्या वेळी दोन्ही मांडवी पूल, रस्त्यावरील वाहतूक अडविण्यात आली. तसेच आंदोलनात काही सहभागीनी हुल्लडबाजी करून पर्यटकांच्या दुचाकी वाहनांच्या चाव्या हिसकावून घेण्यात आल्या. रस्ता रोकोमुळे कुजिरा बांबोळी येथे विद्यालयीन मुले अडकून पडली होती. या प्रकरणी पोलिसांनी बाल कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे संशयितांना अटकपूर्व जामिनासाठी बाल न्यायालयात धाव घ्यावी लागली.

या प्रकरणी येथील पोलिसांनी आंदोलनाच्या दिवशी १३ जणांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली आहे. तसेच अनेकांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनवर हजर राहण्याची सूचना करण्यात आली होती. या आंदोलनाच्या वेळी हुल्लडबाजीची सीडी तयार करून राज्यातील सर्व पोलीस स्टेशनवर पाठवून यात गुंतलेल्यांना अटक करून पणजी पोलिसांच्या स्वाधीन करण्याची सूचना केली होती. अटक होण्याची शक्यता असल्याने ४९ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.