भाजप आमदाराच्या भावास उन्नाव बलात्कारप्रकरणी अटक

0
56

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील १८ वर्षीय तरुणीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी तसेच रविवारी पीडीतेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी पीडीतेने आरोप केलेल्या भाजप आमदार कुलदिप सिंग सेंगार यांचा भाऊ अतुल सिंग याला काल पोलिसांनी अटक केली. तसेच या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. पीडीत तरुणीने आमदार कुलदिप सिंग व त्यांच्या भावांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्या वडिलांच्या मृत्यूलाही आमदार सेंगार यांना जबाबदार धरले आहे.

आमदार कुलदिप सेंगार यांचा भाऊ अतुल सिंग याला अटक केल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक आनंद कुमार यांनी सांगितले की वरील सर्व प्रकरणाचा एसआयटी सखोल तपास करणार आहे. एसआयटीचे नेतृत्व लखनौ विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक करणार आहेत.

आमदार सेंगारकडून इन्कार
दरम्यान भाजप आमदार कुलदिप सेंगार यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला असून विरोधकांनी आपल्याविरुद्ध रचलेले हे कारस्थान असल्याचा दावा केला आहे. मात्र पीडीतेच्या म्हणण्यानुसार तिच्या वडिलांना न्यायालयीन कोठडीत डांबल्यानंतर आमदारांच्या आदेशानुसार त्यांना कोठडीत बेदम मारहाण करण्यात आल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.