
भारताच्या महिला व पुरुष टेबल टेनिस संघांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा कालचा पहिला दिवस गाजवला. महिला संघाने सर्वप्रथम श्रीलंकेवर ३-० असा व यानंतर वेल्सवर ३-१ असा विजय मिळविला. पुरुष संघाने त्रिनिदाद अँड टोबेगोला ३-० अशी धूळ चारली व यानंतर नॉर्दन आयर्लंडवर याच फरकाने विजय प्राप्त केला.
मनिका बात्राला एकेरीच्या पहिल्या लढतीत विजयासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली नाही. तिने इरांदी वारुसाविताना हिला ११-३, ११-५, ११-३ असा सहज धक्का दिला. सुतिर्था मुखर्जीने यानंतर मनिकाचा कित्ता गिरवताना इशारा मनिक्कू बादू हिला ११-५, ११-८, ११-४ अशा फरकाने पराजित केले. सुतिर्थाने यानंतर पूजा सहस्रबुद्धे हिच्यासह दुहेरीत उतरताना हंसनी कापुगेकियाना व इशारा मनिक्कू बादू जोडीला ११-६, ११-७, ११-३ असे काही मिनिटांत नमविले. गटफेरीतील आपल्या दुसर्या लढतीत भारताने वेल्सवर ३-१ असा विजय साकारला. दुहेरीच्या लढतीत मौमा दास व मधुरिका पाटकर यांना ११ वर्षीय ऍना हर्सी व शार्लट केरी यांच्याकडून ८-११, ५-११, ११-५, ११-७, ११-१३ असा पराभव स्वीकारावा लागला.
लढतीतील हा तिसरा सामना होता. तत्पूर्वी, पहिल्या सामन्यात मनिकाने शार्लट केरी हिला ११-८, ८-११, ११-५, ११-४ असे व मौमा दासने क्लो थॉमसला १२-१०, ११-७, ११-७ असे पराजित करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मधुरिका पाटकरने यानंतर एकेरीच्या चौथ्या लढतीत क्लो थॉमसला ११-३, ११-४, १२-१० असे नमवून वेल्सला पुनरागमनाची संधी दिली नाही.
पुरुष संघाचा निकाल ः सामना क्र १. वि. त्रिनिदाद अँड टोबेगो (३-०) ः अँथनी अमलराज वि. वि. डेक्स्टर सेंट लुईस ११-५, ३-११,११-२, १४-१२, जी. साथियान वि. वि. ऍरोन विल्सन ११-५, ११-५, ११-४, जी. साथियान व हरमीत देसाई वि. वि. ऍरोन विल्सन व युवराज डोक्राम ११-९, ११-४, ११-४, सामना क्र. २ वि. नॉर्दन आयर्लंड (३-०) ः जी. साथियान वि. वि. ऍश्ले रॉबिनसन ११-४, ११-६, ११-४, शरथ कमल वि. वि. पॉल मॅक्रिरी ११-६, ११-८, ११-४, जी. साथियान व हरमीत देसाई वि. वि. झॅक विल्सन व पॉल मॅक्रिरी ११-२, ९-११, ११-५, ११-७