भारताकडून श्रीलंका, पाकिस्तानचा फडशा

0
84

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या मिश्र सांघिक प्रकारात भारतीय बॅडमिंटन संघाने दमदार सुरुवात करताना काल श्रीलंका व पाकिस्तानचा ५-० अशा फरकाने पराभव केला. सायना नेहवाल व किदांबी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने सर्वप्रथम श्रीलंकेला लोळविले. केवळ मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारतीय खेळाडूंचा थोडा कस लागला अन्यथा इतर सामने एकतर्फीच ठरले. यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारताने मोठा विजय साकार केला असला तरी जागतिक क्रमवारीत द्वितीय असलेल्या श्रीकांतला मुराद अलीविरुद्ध अपेक्षित खेळ दाखवता आला नाही.

श्रीलंकेविरुद्ध प्रणव चोप्रा व ऋत्विका शिवानी गड्डे यांनी तीन गेमपर्यंत लांबलेल्या लढतीत २१-१५, १९-२१,२२-२० असा विजय मिळवून भारताला चांगली सुरुवात करून दिली. दुसर्‍या सामन्यात मात्र श्रीकांतला विजयासाठी अधिक घाम गाळावा लागला नाही. त्याने निलुका करुणारत्ने याला २१-१६, २१-१० असे अस्मान दाखविले. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी राष्ट्रकुलमध्ये यशस्वी पदार्पण करताना दिनुका करुणारत्ना व बुवानेका गुणथिलका २१-१७, २१-१४ यांना गारद केले. सायना नेहवालने यानंतर मदुशिका बेरुलागे हिला महिला एकेरीच्या सामन्यात २१-८, २१-४ असे केवळ २२ मिनिटांत हरविले. शेवटच्या सामन्यात अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांनी थिलिनी प्रमोदिका व कविदी सिरीनागे यांना २१-१२, २१-१४ असे नमवून भारताच्या विशाल विजयावर शिक्कामोर्तब केले.

दुपारच्या सत्रात भारताची लढत पाकिस्तानशी झाली. सात्विकने सिक्कीसह उतरताना मिश्र दुहेरीत मोहम्मद इरफान सईद भट्टी व पलवाशा बशीर या जोडीचा २१-१०, २१-१३ असा खुर्दा उडवून भारताला १-० अशा आघाडीवर नेले. यानंतर पुरुष एकेरीचा सामना झाला. श्रीकांतने अडखळत्या सुरुवातीनंतर सामना २१-१६, २२-२० असा जिंकला. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने यानंतर पाकिस्तानच्या नवोदित महूर शहजाद हिला २१-७, २१-११ असे लोळवून भारताला ३-० अशी विजयी आघाडी मिळवून दिली. प्रणव जेरी चोप्रा व चिराग शेट्टी यांनी मोहम्मद इरफान सईद भट्टी व मुराद अली यांना २१-९, २१-१५ असे हरवून पाकिस्तानची पाटी कोरीच राहणार याची दक्षता घेतली. अखेरच्या सामन्यात अश्‍विनी व रुत्विकाने महूर व पलवाशा जोडीला २१-६, २१-१० असे नमवून पाकवर ‘व्हाईटवॉश’ लादला. भारताची लढत आज स्कॉटलंडशी होणार आहे.