भारताची लढत श्रीलंका, पाकिस्तानशी

0
104

दिग्गज खेळाडूंनी युक्त भारतीय बॅडमिंटन संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपल्या सुवर्णपदकासाठीच्या मोहिमेची सुरुवात दुबळ्या श्रीलंका व पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. भारताला यंदासाठी अव्वल मानांकन लाभले असून भारताचा श्रीलंका, पाकिस्तान व स्कॉटलंड यांच्यासह ‘अ’ गटात समावेश आहे.
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू, किदांबी श्रीकांत,सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांच्यामुळे भारताला बाद फेरीत प्रवेशासाठी अधिक घाम गाळावा लागणार नाही. २०१० सालच्या रौप्यपदक विजेत्या भारताचे २०१४ साली कांस्यपदक थोडक्यात हुकले होते. प्ले ऑफच्या लढतीत सिंगापूरकडून हरल्यामुळे भारताचे स्वप्न भंगले होते. यावेळी भारताच्या मार्गात तीनवेळचा विजेता मलेशिया व सहावेळच्या विजेता इंग्लंड यांचा प्रमुख अडसर असेल.

मलेशिया संघाने २००६, २०१० व २०१४ साली सुवर्णपदक जिंकले असून त्यांच्यासंघात तीन ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता ली चोंग वेई तसेच पुरुष दुहेरीतील अनुभवी जोडी असलेल्या गोह व्ही शेम व टान वी कियॉंग यांचा समावेश आहे. दुसरीकडे इंग्लंड संघात एकेरीमध्ये राजीव ओसेफ व दुहेरीतील निष्णांत ख्रिस ऍडकॉक व गेब्रिएला ऍडकॉक या पतीपत्नींच्या जोडीचा समावेश आहे. सिंगापूरचा संघ युवा असला तरी उपांत्य फेरी गाठण्यात त्यांन कोणताही अडथळा येण्याची शक्यता फार कमी आहे.

सिंधूचा कोपर दुखावल्याने आज श्रीलंकेच्या मदुशिका दिलरुक्षी बेरुवेलगेविरुद्ध कारेरा स्पोटर्‌‌स एरिनावर महिला एकेरीत सायना नेहवाल उतरणार आहे. प्रणव जेरी चोप्रा व रुत्विका गड्डे ही जोडी मिश्र दुहेरीत सचिन डायस व थिलिनी प्रमोदिका हेंदाहेवा यांच्याविरुद्ध झुंजणार आहे. पुरुष एकेरीत श्रीकांतचा सामना लंकेचा ऑलिंपिकपटू निलुका करुणारत्ने याच्याशी होणार आहे. ग्लास्गोतील स्पर्धेत श्रीकांतने निलुका याला नमविले होते. त्यामुळे या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास श्रीकांत सज्ज झाला आहे. भारताची पुरुष दुहेरीतील आश्‍वासक जोडी असलेल्या सात्विक-चिरागला बुवानेका गुणतिलका दिनुका करुणारत्ने यांच्याशी लढावे लागणार आहे तर महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी ही जोडी थिलिना प्रमोदिका व कविदी सिरीमानागे यांच्याशी दोन हात करेल. संध्याकाळच्या सत्रात भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.