अंकिता रैना व रामकुमार रामनाथन यांनी काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळविले आहे. रैनाने ४३ क्रमांकांची मोठी झेप घेत डब्ल्यूटीए क्रमवारीत २१२वे तर रामकुमारने एटीपी क्रमवारीत चार क्रमांकांची सुधारणा करत १३२वे स्थान मिळविले आहे.
रामकुमारने ४३,००० युरो बक्षीस रकमेच्या स्पेनमधील मार्बेला चॅलेंजर स्पर्धेच्या उपात्यपूर्व फेरीत स्थान मिळविले होते तर ग्वाल्हेर येथे झालेल्या २५,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या आयटीएफ महिला स्पर्धेचे जेतेपद पटकावल्याचा फायदा रैनाला झाला. तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर रैनाने महिला एकेरीचे हे जेतेपद पटकावले होते. महिला एकेरीत कर्मन कौर थंडी (२७३) भारताची दुसरी सर्वोत्तम खेळाडू आहे.
एटीपी क्रमवारीत भारताचा एकेरीतील आघाडीचा खेळाडू युकी भांब्री याने दोन स्थानांची झेप घेत १०५वा क्रमांक मिळविला आहे. यानंतर रामनाथन, सुमीत नागल (२१३, + ५), प्रज्ञेश गुणेश्वरन (२६३, -१७) व अर्जुन खाडे (३९४, + २९) यांचा क्रमांक लागतो. पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा (१९) व दिविज शरण (४३) यांनी प्रत्येकी एका स्थानाने प्रगती केली. लिएंडर पेस ४५व्या स्थानावर कायम आहे. त्यानंतर पूरव राजा (६२) याचा नंबर लागतो. दुखापतीमुळे स्पर्धात्मक टेनिसपासून दूर असलेली सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या ‘टॉप २०’ बाहेर फेकली गेली आहे. सात स्थानाच्या घसरणीसह ती २३व्या स्थानी पोहोचली आहे. मागील सात वर्षांतील तिचा हा सर्वांत खालचा क्रमांक आहे.
स्टीफन्स ‘टॉप १०’मध्ये
मायामी ओपन विजेत्या स्लोन स्टीफन्सने डब्ल्यूटीए क्रमवारीत प्रथमच अव्वल दहा खेळाडूंत स्थान मिळवताना नवव्या स्थानापर्यंत प्रगती केली आहे. मागील क्रमवारीत ती १२व्या स्थानावर होती. रोमानियाची सिमोना हालेप ८१४० गुणांसह पहिल्या तर डेन्मार्कची कॅरोलिन वॉझनियाकी ६७९० गुणांसह दुसर्या क्रमांकावर कायम आहे. स्टीफन्सने पेट्रा क्विटोवा (१०), अँजेलिक कर्बर (११) व दारिया कसातकिवा (१२) यांना प्रत्येकी एका स्थानाने खाली ढकलले.
डब्ल्यूटीए टॉप १० ः १. सिमोना हालेप (रोमानिया, ८१४०), २. कॅरोलिन वॉझनियाकी (डेन्मार्क, ६७९०), ३. गार्बिन मुगुरुझा (स्पेन, ५९७०), ४. इलिना स्वितोलिना (युक्रेन, ५६३०), ५. येलेना ओस्टापेंको (लाटविया, ५६११), ६. कॅरोलिना प्लिस्कोवा (झेक प्रजासत्ताक, ४७३०), ७. कॅरोलिन गार्सिया (फ्रान्स, ४६२५), ८. व्हीनस विल्यम्स (अमेरिका, ४२७७), ९. स्लोन स्टीफन्स (अमेरिका, ३९३८), १०. पेट्रा क्विटोवा (जेक प्रजासत्ताक, ३२७१)