- मनाली पवार
वंध्यत्व ही व्यक्तिगत समस्या नसून, जोडप्याची समस्या असते. त्यामुळे जोडप्यांतील दोघांचा एकत्र विचार करून त्या जोडप्यांसंदर्भात समजलेली वंध्यत्वाची कारणे एक-एक करून दूर करण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने विशिष्ट उपचारांची आखणी केली जाते.
वंध्यत्वाच्या उपचारांची सुरुवात करताना प्रथमतः जोडप्याचे सर्वसाधारण आरोग्य सुधारले जाते. जोडप्यातील एखाद्यास जरी अतिस्थूलपणा, मधुमेह, पंडू, इन्फेक्शन, शारीरिक व मानसिक ताण, अस्वास्थ्य असल्यास त्यावर प्रथम चिकित्सा व उपचार केले जातात. त्याचप्रमाणे मद्यपान, धूम्रपान यासारख्या व्यसनांवर आळा घालावा लागतो आणि त्यानंतर विशिष्ट उपचार सुरू केले जातात.
कित्येकवेळा वंध्यत्वाच्या उपचारांसाठी घाई केली जाते, अशावेळी दोघांच्या शारीरिक तपासणीत दोष न आढळल्यास धीर देणे, आश्वासन देणे हीच चिकित्सा श्रेष्ठ ठरते.
काही तपासण्यांचा बर्याचवेळा उपचार म्हणूनही उपयोग होत असल्याने प्रत्येक तपासणीनंतर काही काळ गर्भधारणा होण्याची वाट पाहणे, हे त्या तपासणीत वंध्यत्वाचे इतर कोणतेही विशिष्ट कारण सापडले नसल्यास हितावह असते. एकूण सर्वच उपचार धीराने व कौशल्याने करावे लागतात. जोडप्यानेही धीर धरणे व आशादायक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असते. तसेच जोडप्याच्या मानसिक, भावनिक, कौटुंबिक व सामाजिक आरोग्याचेही भान ठेवावे लागते.
समागमातील दोष किंवा अडचणी दूर करण्याबरोबरच ऋतुचक्राच्या अंदाजे दहाव्या ते विसाव्या दिवसादरम्यान समागम करावा. समागम केल्यानंतर अर्धा ते एक तास स्त्रीने आडवे (उत्तान) झोपून विश्रांती घेणे हितावह असते. त्याचप्रमाणे मन शांत व आनंदी ठेवून समागम करावा. हा समागम ‘जनन-ऊचीत’साठी आहे असा सकारात्मक विचार करावा. भीत-भीत, घाबरत, मनात असंख्य विचार आणत, नकारात्मक विचार करून गर्भधारणेचा प्रयत्न केल्यास, तो कधीच सफल होत नाही.
पुुरुष वंध्यत्व व उपचार
शोधन चिकित्सा
आयुर्वेदानुरूप कोणत्याही व्याधीची चिकित्सा करताना प्रथम शरीरशुद्धी करावी. तसेच स्वास्थ्यरक्षणासाठी शोधन उपक्रम सांगितले आहेत. यालाच पंचकर्म असे म्हणतात. शरीरशुद्धी हे मुख्य प्रायोजन आहे. वंध्यत्वामध्ये गर्भाशयाच्या चिकित्सा म्हणून शुक्राणू चिकित्सा म्हणूनही याचे महत्त्व आहे. पुरुषामध्ये शुक्रदृष्टी असल्यास स्नेहन-स्वेदनादि पूर्वकर्मानंतर वमन, विरेचन, वस्ती, नस्य इत्यादींचा चांगला फायदा दिसून येतो. उत्तरबस्तीमुळे अल्पशुक्राणूत, लिंग शैथिल्य, मैथुन असमर्थता, जननेंद्रियाचे विकार, हार्मोन्सची उणीव याबाबत अतिशय चांगल्याप्रकारे गुण मिळतो.
आश्वासन
पती-पत्नी दोघांचीही संंपूर्ण तपासणी करून त्यांना वंध्यत्वाविषयीची संपूर्ण माहिती सांगून त्यांच्या शंकांचे निरसन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी देखील प्रयत्न करण्यास सांगावे. आयुर्वेदानुसार मिथ्या आहार-विहार हा संपूर्ण निरोगी शरीराचा पाया असल्यामुळे त्यात पुढीलप्रमाणे बदल घडविणे आवश्यक आहे.
-आहार ः शुक्र हा धातू सौम्य व शीत गुणात्मक असतो. आहारात अतितिखट, अतितेलकट, लवण, आम्ल व तिखट रसाचे अल्पप्रमाणात सेवन करावे.
– मधुररसात्मक, स्निग्ध गुणात्मक तूप-लोणी व दुग्धजन्य पदार्थ योग्य प्रमाणात खावेत.
– शुक्रजनक औषधांमध्ये दूध हे सर्वश्रेष्ठ आहे.
– शिळे, आंबवलेले अन्नपदार्थ, प्रक्रिया केलेले बाहेरील अन्नपदार्थ सेवन करू नयेत.
– विहार- मद्यपान, धूम्रपान व नशा आणणार्या पदार्थांचे सेवन करू नये. त्याचा परिणाम शुक्राणू उत्पत्तीवर होऊन शुक्रदोष निर्माण होतात.
– जास्त काळ उष्णतेच्या संपर्कात राहणे, व्यवसायानिमित्त मर्क्युरी, लेड (शिसे) इत्यादी रसायनांच्या कारखान्यात जास्त वेळ काम करणे, फॅशन म्हणून सतत घट्ट कपड्यांचा वापर करणे, हे सर्व टाळावे. त्यामुळे शुक्रधातूचा र्हास होतो.
सतत मानसिक ताणतणाव, अवास्तव अपेक्षा, व्यवसाय, सतत दिवसपाळी, रात्रपाळी या दुष्टचक्रात अडकल्यामुळेदेखील शुक्रक्षय होतो.
योग व व्यायाम
सकाळी लवकर उठून ताज्या हवेमध्ये चालल्यामुळे त्याचबरोबर सर्वांगासन, हलासन, सूर्यनमस्कार, कपालभाती व भस्तिष्का या योगासनामुळे शरीराला मदत होते व पर्यायाने शुक्रधातू उत्पत्तीस चालना मिळते. ध्यानधारणा केल्यामुळे मानसिक बल वाढते.
पुरुषांवरील उपचार
– शिश्नोत्थान असमर्थता अर्थात नपुंसकत्व व अकाल वीर्यस्खलन यांंवरील उपचार प्रामुख्याने मानसिक स्वरूपाचे असतात.
– शुक्राणूंचा वीर्यात अभाव असणे यावरील उपचार असमाधानकारक असतात.
– थंड पाण्याने स्नान करणे आणि वृषण थोडा वेळ थंड पाण्यात बुडवून ठेवणे.
– शुक्रवाहिनीतील अडथळ्यामुळे वीर्यात शुक्राणूंचा अभाव असल्यास ते अडथळे दूर करणे.
अश्वासन, पंचकर्मांद्वारे शरीरशुद्धी झाल्यावर, इतर अडथळे दूर झाल्यावर रसायन व वृष्य औषधांचा उपयोग करावा.
वाजीकरण
कामतृप्ती होईपर्यंत स्त्रियांना अप्रतिहतन्वाने तर्पण करणारे जे योग त्याला वाजीकरण योग म्हणतात.
– विकारामुळे, श्रमामुळे, अतिव्यवायामुळे क्षीण झालेल्यांनी वाजीकरण करावे.
* ज्यामुळे शुक्रधातू वाढतो ः अश्वगंधा, मुसबी, शर्करा, शतावरी.
* शुक्ररेचक औषधे ः माप, भल्लातमा, फलमज्जा, आमलक व बृहतिफल.
* शुक्रप्रवर्तनासाठी स्त्री हे उत्तम औषध आहे.
* शुक्रस्तंभनासाठी जातिफल
आयुर्वेद शास्त्रामध्ये इतक्या बारकाईने शुक्रधातूचा विचार केलेला आहे, शुक्रधातूसाठी प्रवर्तन, स्तंभन, वर्धन वा रेचन यापैकी कोणताही भाग चिकित्सोपयोगी आहे, याचा विचार करून औषधयोजना द्यावी.
– वाजीकरण योग- बस्ताण्ड सिद्ध दूध पिण्यास द्यावे.
– बस्ताण्ड सिद्ध दूध तीळ टाकून थोडे थोडे खावे.
– पिंपळी, उडीद, तांदूळ, गहू आणि सातू यांचे पीठ एकत्र करून, पुरी करून, तूप घालून खडीसाखर असलेल्या दुधाबरोबर खावी.
– सरबत, फलरस, गोड बोलणे, स्वच्छ, सुंदर, मऊ शय्या, सुगंधी फुलांच्या माळा, गीत किंवा वाद्यांचे लवण, आलिंगनादि विविध प्रकार हे सर्व गर्भधारणेसाठी उपयुक्त असे वाजीकरण योग आहेत.
वाजीकरणाच्या नित्य सेवनाने नेहमी यथेच्छ संभोग केला, तर शुक्रक्षय होत नाही. मन संतुष्ट व असाही राहते. गुणवान, वीर्यवान शुक्रसार, संतती तो निर्माण करू शकतो.
रसायन चिकित्सा
– वातदृष्टीमुळे शुक्रदृष्टी असल्यास निरुह, अनुवासनबक्की रसायन दिले जाते. कफदृष्टीमुळे शुक्रदृष्टी असल्यास पिप्पली रसायन, भल्लातक रसायन यांचा वापर सहसा केला जातो.
– स्वस्थ माणसाची शक्ती वाढवणारे, रोग होऊ न देणारे, जे सूक्ष्म पचन सुधारते व शक्तिवर्धक असते, जे शुक्रधातू वाढवते व त्याचबरोबर सातही धातूंना बल देऊन त्यांची उत्तम निर्मिती करून जे शुक्र वाढवते त्याला रसायन म्हणतात.
– रसायन औषधांच्या सेवनाने ‘दीर्घायुष्य’ मिळते.
– शुक्रदोषांमध्ये चिकित्सा करत असताना स्नेहन, स्वेदनारी कर्मे करून रसायन औषधांचा उपयोग करावा.
– शुक्रदोषांमध्ये ‘अपत्यकाम’ अशा रसायनांचा उपयोग करावा, म्हणूनच हे रसायन वृद्धवयात वापरू नये.
– वयःस्थापन म्हणजे तारुण्य कायम ठेवणारी चार औषधे सांगितली आहेत. थंड पाणी, दूध, मध, तूप. प्रकृतीनुसार एकेरी किंवा मिश्र करून रसायन म्हणून उपयोग करावा. तूप व मध एकत्र करून घ्यावे. फक्त समप्रमाणात घेऊ नये. कफप्रकृती असल्यास मध जास्त व तूप कमी असे घ्यावे. अशाप्रकारे विचार करून तूप, दूध, मध एकत्र किंवा दूध, पाणी, मध एकत्र असे घ्यावे.
– ज्येष्ठमध + मध + विडंग + तंडुल + थंड पाणी + मध + आवळ्याचा रस, मनुकांचा काढा + मध, अतिबला, नागबला + भुईकोहळा, शतावरी, पाणी, दूध व मध यांचा योग्य तो उपयोग केल्यास ‘अंत्यकाम’ रसायन प्राप्त होते.
त्याचबरोबर आमलक रसायन, भल्लानक रसायन, पिप्पली रसायन, मेध्य रसायन, शिलाजन रसायन अशा रसायनांचा वापर करता येतो. रसायनाने शरीर धातूंचा सारता वाढते.
वाजीकरण करण्यापूर्वी अशक्त माणसाला रसायन द्यावे.
पुरुषाला चिकित्सा द्यायची नाही असे आयुर्वेदशास्त्रात कोठेही सांगितलेले नाही. अनपत्यता असल्यास दोघांनाही चिकित्सा द्यावी. आश्वासनानंतर पंचकर्मांद्वारे शरीरशुद्धी केल्यावर पुरुषाला रसायन औषधांची योजना करावी व तत्पश्चात वाजीकरण चिकित्सा. अशाप्रकारे औषधोपचार केल्यास पुरुषांमधील वंध्यत्वास कारणीभूत असलेले अडथळे दूर होतात.