विश्‍वजित राणे आज फडणवीसांना भेटणार

0
130

>> गोमेकॉत महाराष्ट्रातील रुग्णांना मोफत सेवेबाबत चर्चा करणार

महाराष्ट्रातून उपचारांसाठी गोमेकॉत येणार्‍या रुग्णांच्या उपचारांचा खर्च महाराष्ट्र सरकारने उचलावा अशी सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यासाठी आज (बुधवारी) मुंबईत जाऊन आपण त्यांची भेट घेणार असल्याचे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. कोणत्याही परिस्थितीत परराज्यातून येणार्‍या रुग्णांना गोमेकॉत मोफत आरोग्यसेवा देण्यात येणार नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

नीलेश राणे यांच्यासारखे महाराष्ट्रातील काही नेते विनाकारण याविषयावर राजकारण करू पाहत असल्याचा आरोपही राणे यांनी यावेळी केला. तसेच महाराष्ट्रातील रुग्णांना शुल्क आकारण्याच्या प्रश्‍नावरून गोव्याला धमकी देणार्‍या नीलेश राणे यांच्या धमक्यांना आपण भीक घालत नसल्याचे राणे म्हणाले.

महाराष्ट्र सरकारला प्रस्ताव
महाराष्ट्र सरकारने आपल्या आरोग्य विमा योजनेखाली गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाला व आझिलोला ऍमपॅनल्ड करावे, असा एक प्रस्ताव आपण फडणवीस यांना देणार आहे, असेही राणे यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र सरकारची आरोग्य विमा योजना आहे काय, असे विचारले असता त्यांची विमा योजना नसेल तर मग त्यांना दुसर्‍या कोणत्या तरी पर्यायाचा विचार करावा लागणार असल्याचे राणे म्हणाले. आपण त्यांच्यापुढे दोन-तीन पर्याय ठेवणार असल्याचे सांगून गोमेकॉला एक ‘कॉपर्‌‌स’ फंड देणे असाही एक पर्याय ठेवणार असल्याचे आरोग्य मंत्री म्हणाले.

समझोता करारही करणार
देवेंद्र फडणवीस यांच्याशी वरील प्रकरणी बोलणी करून आपण त्याबाबत एक समझोता करारही करण्याचा विचार करीत असल्याचे राणे यांनी नमूद केले. त्यासंबंधीचे सर्व तपशील तयार करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग, सावंतवाडी भागांतून मोठ्या प्रमाणात गोमेकॉत रुग्ण येत असतात. कर्नाटक व महाराष्ट्रातील सीमा भागांतून येणार्‍या या रुग्णांमुळे गोमेकॉ इस्पितळावर प्रचंड ताण पडत असतो. आम्ही इस्पितळ सुरू केले आहे ते गोव्यातील लोकांसाठी. अन्य राज्यातील लोकांना मोफत सेवा देणे शक्य नाही असे ते म्हणाले.

गोमेकॉतील दलालांचा
बंदोबस्त करणार
महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा भागातील ३० ते ३५ टक्के रुग्ण गोमेकॉत येतात. शिवाय येथे पोटा-पाण्यानिमित्त आलेल्या बिहारी लोकांचीही गोमेकॉत गर्दी असते. याचा फायदा घेत गोमेकॉत काही दलालही तयार झालेले आहेत. रुग्णांना लवकर तपासणीसाठी पाठवण्याची सोय करण्याचे आमीष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेणार्‍या या दलालांचा आपण लवकरच बंदोबस्त करणार असल्याचे यावेळी राणे म्हणाले.

गोमेकॉ इस्पितळ परिसरात
मुलांच्या इस्पितळाचा प्रस्ताव
बांबोळी येथील गोमेकॉ परिसरात पीपीपी तत्त्वावर एक खास मुलांसाठीचे इस्पितळ सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.
मूळ गोमंतकीय पण सध्या गोव्याबाहेर असलेल्या एका सुप्रसिद्ध बालतज्ज्ञाच्या मदतीने हे इस्पितळ उभारण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या इस्पितळासाठी लागणारी जमीन सरकार देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. एकनाथ नाईक यांचा हा प्रस्ताव आहे.

दरम्यान, गोव्यातील कित्येक तज्ज्ञ डॉक्टर विदेशात असून या डॉक्टरांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देण्यासाठी बोलावून घेण्यात येणार आहे. हे डॉक्टर गोमेकॉत आले की तेथील डॉक्टरांनाही त्याचा फायदा होणार असल्याचे राणे म्हणाले.

राहुल काकोडकर या कर्करोग तज्ज्ञाला गोमेकॉत सेवा देण्यासाठी बोलावून घेण्यात येणार आहे. शिवाय अन्य काही डॉक्टरांनाही गोमेकॉत रुजू होण्यासाठी पाचारण करण्यात येणार आहे. शिवाय गोमेकॉतील डॉक्टरांना विदेशात जाऊन चांगले शिक्षण घेण्यासाठी सरकारी खर्चाने पाठवण्यात येणार असल्याचेही राणे म्हणाले.

आज इनहाऊस फार्मसीचे उद्घाटन
गोमेकॉत आज (बुधवारी) इन हाऊस फार्मसीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ही फार्मसी २४ तास चालू राहणार असून ती सुरू झाल्यानंतर रुग्णांना सर्व औषधे तेथेच उपलब्ध होणार असल्याने औषधे आणण्यासाठी बाहेर जाण्याची पाळी त्यांच्यावर येणार नसल्याचे राणे यांनी नमूद केले.