चंद्रकांत कवळेकरांच्या अटकपूर्व जामीनास एसीबीकडून विरोध

0
110

>> पुढील सुनावणी ३ एप्रिलला

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास एसीबीने विरोध दर्शविला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी कवळेकर यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे, असा युक्तिवाद एसीबीच्या वकिलांनी न्यायालयात केला. दरम्यान, सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर आपली बाजू मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी न्यायालयाकडून अवधी मागून घेतला आहे. बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी कवळेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी ३ एप्रिल रोजी होणार आहे.
भ्रष्टाचार विरोधी विभागाने (एसीबी) बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी विरोधी पक्षनेते कवळेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अटक होण्याची शक्यता असल्याने विरोधी पक्षनेते कवळेकर यांनी उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

कवळेकर यांनी कॉंग्रेसच्या राजवटीत गोवा औद्योगिक महामंडळाचे अध्यक्षपदी कार्यरत असताना बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचा आरोप आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात ४.७८ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. कवळेकर यांच्या केरळ येथे अनेक मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात आढळून आले आहे.

तसेच कवळेकर यांनी मुंबईतील एका कंपनीकडून पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचे तपास यंत्रणेला आढळून आले आहे. कवळेकर यांच्याविरोधात २०१२ मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी तपास करून अहवाल सरकारला सादर करण्यात आला होता. राज्य सरकारने २०१७ मध्ये कवळेकर यांच्याविरोधात पुढील कारवाई करण्याची सूचना केल्यानंतर विरोधी पक्षनेते कवळेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.