केरळचा बंगालला धक्का

0
92

केपी राहुल याने सामन्याच्या अंतिम मिनिटांत केलेल्या गोलाच्या बळावर केरळने ७२व्या संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेच्या काल मंगळवारी झालेल्या गट फेरीतील लढतीत विद्यमान विजेत्या बंगालवर १-० असा निसटता विजय मिळविला. या विजयासह त्यांनी ‘अ’ गटात अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उभय संघांनी निर्धारित वेळेत अनेक संधी वाया घालविल्या. उजव्या बगलेतून जितीन एम.एस. याने दिलेल्या क्रॉसवर राहुलने सामन्यातीन एकमेव गोल केला. गट फेरीच्या समाप्तीनंतर केरळचे ४ सामन्यांतून १२ तर बंगालचे ९ गुण झाले. उपांत्य फेरीत बंगालचा सामना ‘ब’ गटात अव्वल स्थान मिळविणार्‍या संघाशी होणार आहे. तर केरळला गटातील उपविजेत्याशी झुंजावे लागेल. दोन्ही उपांत्य सामने ३० रोजी खेळविले जाणार आहेत. केरळ व बंगालने काल आपल्या प्रमुख खेळाडूंनी विश्रांती देताना प्रत्येकी चार बदल केले. केरळने जेस्टिन जॉर्ज, जितीन गोपालन, जियाद हसन, मिधुन व्ही. यांना विश्रांती देत हजमल एस., श्रीराग जी., शामनास बीएल व विबिन थॉमस यांना संधी दिली. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून यापूर्वीच बाहेर झालेल्या महाराष्ट्राने दिवसातील दुसर्‍या सामन्यात मणिपूरवर ७-२ असा विजय मिळविला.

मध्यंतरापर्यंत महाराष्ट्राचा संघ १-२ असा पिछाडीवर होता. मणिपूरतर्फे चान्सो होराम याने १७व्या मिनिटाला पहिला गोल केला. साहील भोकारेने २८व्या मिनिटाला महाराष्ट्राला बरोबरी साधून दिली. धावरेम धनंजय सिंगने ४०व्या मिनिटाला स्पॉटकिकवर गोल करत ईशान्य भारतातील राज्याला पुन्हा आघाडीवर नेले. मध्यंतरानंतर महाराष्ट्राकडून रणजीत सिंग याने ५९व्या, ७८व्या व भरपाई वेेळेत गोल केले. निखिल प्रभू (७६वे मिनिट), किरण पांढरे (८७वे मिनिट) व मोहम्मद रहमान अन्सारी (भरपाई वेळ) यांनी गोल नोंदविणार्‍यांमध्ये आपलेदेखील नाव नोंदविले. आज गोवा विरुद्ध पंजाब तसेच मिझोरम व कर्नाटक यांच्यात सामने होणार आहे. उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी गोव्याला विजय गरजेचा असून यानंतर मिझोरमने कर्नाटकला नमविले तरच गोव्याचा संघ अंतिम चारांत जाऊ शकतो.