
यजमान न्यूझीलंडने इंग्लंडवर काल एक डाव व ४९ धावांनी नाट्यमय विजय संपादन केला. पावसाने बाधित झालेल्या या सामन्यात किवीज संघ विजयी ठरला तेव्हा शेवटच्या दिवसातील १८.५ षटकांचा खेळ शिल्लक होता. या दोन देशांत आत्तापर्यंत १०२ कसोटी सामने झाले असून न्यूझीलंडने मिळविलेला हा केवळ दहावा विजय ठरला.
ईडन पार्कवरील या दिवस-रात्र कसोटीत शेवटच्या दिवशी इंग्लंडने ३ बाद १३२ धावांवरून पुढे खेळताना सावध पवित्रा अवलंबला. परंतु, खेळपट्टीवर टिकून राहताना धावा जमविण्याचे तंत्र न अवलंबल्याचा फटकदेखील त्यांना बसला. संघाची धावसंख्या १४२ असताना डेव्हिड मलान याला साऊथीने वैयक्तिक २३ धावांवर तंबूचा रस्ता दाखविला. कुर्मगती फलंदाजी करून बॅअरस्टोवदेखील २६ धावा करून बाद झाला. बॅअरस्टोव बाद झाला तेव्हा इंग्लंडचे द्विशतकदेखील फलकावर लागले नव्हते. मोईन अलीने २८ धावांचे योगदान दिले. परंतु, एकालाही चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. बेन स्टोक्सने किल्ला लढवताना ६६ धावांची खेळी केली. यावेळी इंग्लंडचा संघ सामना अनिर्णित राखण्याच्या वाटेवर होता. परंतु, दुसरे सत्र संपण्याच्या वाटेवर असताना स्टोक्सच्या पतनामुळे न्यूझीलंडने पुन्हा पकड मिळविली. न्यूझीलंडला पुन्हा फलंदाजीला उतरवण्यासाठी शेवटच्या सत्रात इंग्लंडला ६९ धावांची गरज होती व त्यांचे तीन गडी शिल्लक होते. शेवटच्या सत्रात मात्र इंग्लंडच्या शेपटाने अधिक प्रतिकार न करता सामना न्यूझीलंडला बहाल केला. मालिकेतील दुसरा कसोटी सामना ख्राईस्टचर्च येथे शुक्रवारपासून खेळविला जाणार आहे.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ःसर्वबाद ५८, न्यूझीलंड पहिला डाव ः ८ बाद ४२७ घोषित
इंग्लंड दुसरा डाव ः ३ बाद १३२ वरून ः डेव्हिड मलान झे. लेथम गो. साऊथी २३, बेन स्टोक्स झे. साऊथी गो. वॅगनर ६६, जॉनी बॅअरस्टोव झे. विल्यमसन गो. ऍस्टल २६, मोईन अली पायचीत गो. बोल्ट २८, ख्रिस वोक्स झे. निकोल्स गो. वॅगनर ५२, क्रेग ओव्हर्टन पायचीत गो. ऍस्टल ३, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद १, जेम्स अँडरसन झे. बोल्ट गो. ऍस्टल १, अवांतर १२, एकूण १२६.१ षटकांत सर्वबाद ३२०
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट २७-९-६७-३, टिम साऊथी २६-४-८६-१, कॉलिन डी ग्रँडहोम २४-१०-४०-०, नील वॅगनर ३२-११-७७-३, टॉड ऍस्टल १६.१-५-३९-३, केन विल्यमसन १-०-१-०