विजयासाठी विजय

0
109

राज्यसभेच्या काही जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या गोरखपूर आणि फूलपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढल्याचा दावा जरी केला जात असला तरी ज्या प्रकारे भाजपाने नवव्या उमेदवाराला राज्यसभेवर पाठवले तो सारा प्रकार काही पक्षाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा उंचावणारा नाही. बहुजन समाज पक्षाच्या एका आमदाराने भाजपाच्या उमेदवाराच्या पारड्यात मत टाकल्यानेच त्यांना ही अतिरिक्त जागा पटकावता आली आहे. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत आकस्मिकपणे एकत्र आले आणि त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना अस्मान दाखवले होते. बहुजन समाज पक्षाच्या एका आमदाराला फोडून त्याचा वचपा यावेळी जरी काढला गेला असला, तरी त्यातून सपा – बसपामध्ये फूट पडणार नाही असा निर्वाळा मायावतींनी दिलेला आहे. त्यामुळे केवळ निवडणूक जिंकण्यासाठी अशा गैरगोष्टींना उत्तेजन देण्याची ही कृती पक्षाच्या ‘पार्टी विथ द डिफरन्स’ या नार्‍याला निकाली काढणारीच आहे. आज भाजपा केवळ विजय संपादन करण्यामागे लागलेला दिसतो आहे. त्यासाठी कोणत्याही माध्यमाचा अवलंब करण्यास पक्षनेते मागेपुढे पाहताना दिसत नाहीत. आयाराम गयाराम संस्कृतीविरुद्ध एकेकाळी टीकास्त्रे सोडणारा हा पक्ष आज आपल्या पक्षात नरेश अगरवालपासून नारायण राणेंपर्यंतचे आयाराम आयात करीत चाललेला पाहून आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही. ईशान्येच्या त्रिपुरासारख्या राज्यांमध्ये पक्षाने शून्यातून दोन तृतीयांश बहुमतापर्यंत भरारी घेतली म्हणून कौतुक झाले, परंतु तेथे उमेदवार कोण होते? अन्य पक्षांतून आयात केलेल्या राजकारणी मंडळींनीच भाजपाच्या झेंड्याखाली ती निवडणूक लढवल्याने तेथे भगवा फडकल्यासारखे दिसले. राज्याराज्यांमध्ये आज भाजपा स्वतःचा झेंडा रोवण्यास आतुर आहे, परंतु त्यासाठी जी रणनीती आखली जात आहे ती पाहिल्यास काहीही करून विजय संपादन करणे हेच पक्षाचे ध्येय बनले आहे की काय असा प्रश्न पडतो. राज्यसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये नऊ, छत्तीसगढमध्ये एक आणि कर्नाटकात उद्योगपती राजीव चंद्रशेखर यांची एक मिळून अकरा जागा भाजपाने आपल्या पारड्यात घेतल्या. याउलट पश्चिम बंंगाल, कर्नाटक, तेलंगण आणि केरळ या विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये राज्यसभेच्या जागांवर विरोधी उमेदवार बहुसंख्येने निवडून आलेले आहेत. उत्तर प्रदेशमधील नववी जागा खरे तर सपा – बसपा – कॉंग्रेसच्या उमेदवाराला मिळायची होती, परंतु बसपच्या एका आमदाराला फोडले गेले, त्याची परिणती म्हणून भाजपाला ती अतिरिक्त जागा मिळाली. राज्यसभेमध्ये आपण अल्पमतात आहोत हे भाजपा सरकारसाठी सतत अडचणीचे ठरले आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुका बहुधा सर्वसहमतीने लढल्या जात असताना यावेळी भाजपाने त्यात आपले उमेदवार उतरवून आणि प्रत्यक्ष निवडणूक घ्यायला लावून चुरस निर्माण केलेली होती. गेल्या पंधरा मार्चच्या निवडणुकीत दहा राज्यांतील ३३ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आलेले होते, परंतु त्यानंतरच्या या निवडणुकांमध्ये चुरस निर्माण केलेली होती. पंचवीसपैकी अकरा जागा भाजपाच्या पारड्यात आता पडलेल्या आहेत आणि त्यातील नऊ उत्तर प्रदेशमधील आहेत. विरोधकांनीही राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपली खेळी खेळली. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर कॉंग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी राज्यसभेवर निवडून गेले आहेत. उत्तर प्रदेशात सपा – बसपाने लोकसभा निवडणुकीवेळी केलेली आकस्मिक युती राज्यसभा निवडणुकीतही कायम राहिली आणि राज्यसभेच्या निवडणुकीत बसपाचा एक आमदार फुटूनही अद्याप तरी ती अभेद्य राहिली आहे. त्यामुळे २०१९ च्या आगामी लोकसभा निवडणुकीतही जर ही युती अशीच अभेद्य राहू शकली, तर भाजपासाठी ते आव्हान ठरू शकते. उत्तर प्रदेश हे राजकीयदृष्ट्या देशातील एक अत्यंत महत्त्वाचे राज्य ठरते. जो पक्ष हे राज्य सर करतो, त्याला केंद्रात सरकार बनवण्याची अधिक संधी असते. त्यामुळे उत्तर प्रदेश आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्नांची शर्थ करणार आहे. परंतु त्यासाठी पुढील काळामध्ये या राज्यसभा निवडणुकीप्रमाणे घोडेबाजाराला ऊत येणार का हा खरा सवाल आहे. लवकरच कर्नाटकची विधानसभा निवडणूक येत आहे.
कर्नाटकमध्ये राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार व उद्योगपती राजीव चंद्रशेखर यांना त्यांच्या पक्षाच्या ४४ या संख्याबळापेक्षा सहा मते अधिक मिळाली. ही मते अर्थात छोटे पक्ष आणि अपक्षांकडून मिळाली. त्यामुळे चंद्रशेखर यांच्या मतांची संख्या ४६ ऐवजी पन्नासवर गेली. जसजशा लोकसभेच्या निवडणुका जवळ येतील, मात्र, हा लढा नैतिक पायावर होणे आवश्यक आहे. काहीही करून आणि कसेही करून आपला झेंडा रोवण्याचा अट्टहास भले संख्या दाखवील, परंतु तत्त्वे आणि विचारधारेचे काय?