राज्यातील ९६ टक्के शालेय विद्यार्थ्यांना यापूर्वीच आधारद्वारे जोडण्यात आलेले असून उर्वरित ४ टक्के विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी गोवाभरात २४ केंद्रे स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक गजानन भट यांनी काल दिली.
ही केंद्रे स्थापन करण्यासाठी नियोजन व सांख्यिकी खात्याची मदत घेण्यात येणार असून हे खाते त्यासाठी लागणारे साहित्य पुरवणार आहे, असे भट यांनी स्पष्ट केले. ह्या केंद्रांवर काम करण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासणार असून त्यासाठी यापूर्वीच सरकारी हायस्कूलमधील संगणक शिक्षकांची मदत घेण्यात आली असल्याचे भट यांनी स्पष्ट केले.
वरील ४ टक्के विद्यार्थ्यांबरोबरच ज्या विद्यार्थ्यांची आधारकार्डे बर्याच पूर्वी करण्यात आली होती त्यांची नव्याने आधारकार्डे करून त्यांना नव्याने आधाराद्वारे जोडण्याचे कामही करावे लागणार असल्याचे भट म्हणाले.
१२ तालुक्यांत प्रत्येकी २ मिळून २४ केंद्रें ह्या विद्यार्थ्यांना आधार कार्डांद्वारे जोडण्यासाठी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती भट यांनी दिली.