
>> आयर्लंड-अफगाण सामन्यातील विजेत्याला मिळणार संधी
दुबळ्या संयुक्त अरब अमिरातने आयसीसी विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या ‘सुपर सिक्स’ फेरीत काल गुरुवारी धक्कादायक निकालाची नोंद करताना यजमान झिंबाब्वेचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ३ धावांनी पराभव केला. या पराभवामुळे झिंबाब्वेला आगामी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळविणे शक्य झाले नाही. आयर्लंड व अफगाणिस्तान यांच्यात आज सामना होणार असून यातील विजेता संघ वर्ल्डकपसाठी पात्र ठरेल. पावसामुळे आजचा सामना रद्द झाला तरी सरस निव्वळ धावगतीवर आयर्लंडचा संघ पात्र ठरेल. केवळ सामना बरोबरीत सुटला तरच झिंबाब्वेचा संघ नशीबवान ठरेल. वेस्ट इंडीजने परवा स्कॉटलंडला नमवून यापूर्वीच पात्रता मिळविली आहे. केवळ दोनच देश पात्र ठरणार असल्याने झिंबाब्वेने कालच्या पराभवासह नामी संधी गमावली.
नाणेफेक जिंकून झिंबाब्नेने युएईला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. युएईने ४७.५ षटकांत ७ बाद २३५ धावा केल्या. पावसामुळे त्यांचा डाव पूर्ण होऊ शकला नाही. झिंबाब्वेसमोर डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ४० षटकांत २३० धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. झिंबाब्वेला ४० षटकांत ७ बाद २२६ धावांपर्यंतच पोहोचता आले.
धावफलक
युएई ः रोहन मुस्तफा पायचीत गो. रझा ३१, अश्फाक अहमद झे. टेलर गो. चतारा १०, गुलाम शब्बीर त्रि. गो. रझा ४०, रमीझ शहजाद झे. क्रिमर गो. चतारा ५९, शैमन अन्वर झे. मुझाराबानी गो. रझा ३३, मोहम्मद उस्मान झे. एर्विन गो. विल्यम्स ४, अदनान मुफ्ती नाबाद १०, अहमद रझा झे. मिरे गो. मुझाराबानी ८, मोहम्मद नावेद नाबाद २२, अवांतर १८, एकूण ४७.५ षटकांत ७ बाद २३५, गोलंदाजी ः जार्विस ८-२-३८-०, चतारा ७-०-४९-२, मुझाराबानी ७.५-१-४०-१, रझा १०-०-४१-३, क्रिमर १०-१-३४-०, विल्यम्स ५-९-२९-१
झिंबाब्वे (लक्ष्य ४० षटकांत २३०) ः सोलोमन मिरे झे. शैमन गो. नावेद ६, मासाकाद्झा त्रि. गो. नावेद ७, पीटर मूर झे. मुफ्ती गो. कादिर ३९, ब्रेंडन टेलर त्रि. गो. रझा १५, शॉन विल्यम्स झे. हयात गो. मुस्तफा ८०, सिकंदर रझा झे. शैमन गो. मुस्तफा ३४, क्रेग एर्विन नाबाद २२, ग्रीम क्रिमर त्रि. गो. नावेद ०, काईल जार्विस नाबाद ६, अवांतर १७, एकूण ४० षटकांत ७ बाद २२६, गोलंदाजी ः नावेद ८-०-४०-३, कादिर ८-०-३८-१, हयात ८-०-४७-०, अहमद रझा ८-०-३७-१, मुस्तफा ८-०-५६-२
इंग्लंडचा ५८ धावांत खुर्दा
ऑकलंड
न्यूझीलंडविरुद्ध कालपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव ९४ मिनिटांत ५८ धावांत आटोपला. दिवस-रात्र पद्धतीने व गुलाबी चेंडूने खेळविण्यात येत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावांत ३ बाद १७५ धावा केल्या असून त्यांचा संघ ११७ धावांनी आघाडीवर आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने इंग्लंडला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर इंग्लंडचा संघ ९ बाद २७ असा संकटात असताना ओव्हर्टन याने नाबाद ३३ धावा चोपत इंग्लंडला अर्धशतकी वेस ओलांडून दिली. यजमानांकडून बोल्ट याने ३२ धावांत ६ व साऊथीने २५ धावांत ४ गडी बाद केले. न्यूझीलंडने यानंतर कर्णधार केन विल्यमसन (नाबाद ९१) याच्या बळावर भक्कम स्थिती गाठली आहे. हेन्री निकोल्स २४ धावा करून त्याला साथ देत आहे. इंग्लंडतर्फे जेम्स अँडरसनने २ तर स्टुअर्ट ब्रॉडने १ गडी बाद केला आहे.
पाहुण्या कांगारूंची मजबूत पकड
नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतरही पाहुण्या ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन येथे सुरू झालेल्या तिसर्या कसोटी सामन्यावर पकड मिळविली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी कांगारूंनी यजमानांची ८ बाद २६६ अशी दयनीय स्थिती केली असून सलामीला आलेला डीन एल्गार १२१ धावा करून कांगारूंचा नेटाने सामना करत आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ २ बाद २२० अशा भक्कम स्थितीत होता. परंतु, डीव्हिलियर्स (६४) बाद झाल्यानंतर यजमानांच्या डावाला उतरती कळा लागली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने भेदक मारा करताना ४ गडी बाद केले. हेझलवूडने २ तर स्टार्क व मिचेल मार्शने प्रत्येकी एक बळी घेतला.