भाजप आघाडी सरकारला राज्यातील खाण बंदीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात अपयश आल्याने खाण अवलंबितांना रस्त्यावर उतरावे लागले. त्यामुळे खाण अवलंबितांचे सोमवारचे रास्ता रोको आंदोलन व लाठीमाराला राज्य सरकार जबाबदार आहे. खाण अवलंबितांवर झालेल्या लाठीमाराची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेस विधिमंडळ गटाच्या बैठकीत काल करण्यात आली. याच बैठकीत कॉंग्रेस पक्षाने खाण बंदीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
राज्य सरकारला दीड महिन्यात खाण बंदीच्या प्रश्नावर कोणताही तोडगा काढण्यात यश आले नाही. यामुळे खाण व्यवसायावर उपजीविका करणार्यांना खाण बंदीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरण्यास राज्य सरकारने भाग पाडले, अशी टिका त्यांनी केली. राज्यातील खाणी लवकर पूर्ववत होण्यासाठी तोडगा काढण्यासाठी कॉंग्रेस विधिमंडळ गटाने ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे, विरोधी पक्षनेते कवळेकर, आमदार दिगंबर कामत, आलेक्स रेजिनाल्ड, नीळकंठ हर्ळणकर, विल्फेड डिसा यांचा समावेश असलेली समिती स्थापन केली. राज्यातील खाणी लवकर पुन्हा सुरू व्हाव्यात म्हणून ही समिती कायदा सल्लागार व इतरांशी चर्चा करून प्रस्ताव तयार करणार आहे, अशी माहिती कवळेकर यांनी दिली.