चहल द्वितीय

0
142

>> आयसीसी टी-२० क्रमवारीची घोषणा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत गोलंदाजांमध्ये युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर या भारताच्या स्टार दुकलीने मोठी मजल मारली आहे. रविवारी संपलेल्या भारत-बांगलादेश व श्रीलंकेचा समावेश असलेल्या निदाहास तिरंगी -२० मालिकेत भारताकडून सर्व पाचही सामने खेळलेल्या या फिरकीपटूंनी प्रत्येकी ८ बळी घेत भारताच्या मालिका विजयात सिंहाचा वाटा उचलला. सुंदरने प्रामुख्याने पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करताना केवळ ५.७०च्या इकॉनॉमीने तर चहलने ६.४५च्या इकॉनॉमीने बळी घेतले. चहलने तब्बल १२ स्थानांची उडी घेत थेट दुसरे स्थान मिळविले आहे. त्याच्या खात्यात ७०६ गुण जमा आहेत. दुसरीकडे नवोदित सुंदरने १५१ क्रमांकांनी वर सरकताना न्यूझीलंडच्या टिम साऊथीसह संयुक्त ३१वा क्रमांक प्राप्त केला आहे. सुंदरने ४९६ गुण आहेत.

सध्या प्रगतीपथावर असलेल्या विश्‍वचषक पात्रता स्पर्धेत खेळत असलेला अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान पहिल्या स्थानी कायम आहे. गोलंदाजीत सुंदर व चहलव्यतिरिक्त श्रीलंकेचा अकिला धनंजया, बांगलादेशचा रुबेल हुसेन तसेच भारताच्या जयदेव उनाडकट व शार्दुल ठाकूर यांनी आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळविले आहे. धनंजया ४८८ गुणांसह संयुक्त ३५व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

७ बळी घेत बांगलादेशचा मालिकेतील सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरलेल्या रुबेल हुसेनने ४० क्रमांकांची प्रगती करत ४२वे स्थान प्राप्त केले आहे. उनाडकट (संयुक्त ५२वा) व ठाकूर (संयुक्त ७६वा) यांनी अनुक्रमे २६ व ८५ स्थानांची उडी घेतली आहे. फलंदाजीत शिखर धवन, कुशल परेरा, मनीष पांडे, मुश्फिकुर रहीम, कुशल मेंडीस व दिनेश कार्तिक यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे. कार्तिकने १२६व्या स्थानावरून थेट ९५वे स्थान मिळविले आहे. त्याच्या खात्यात २४६ गुण जमा आहेत. कुशल परेरा विसाव्या (+ २०) व कुशल मेंडीस ४८व्या (+ २७) स्थानावर आहे. परेराने मालिकेत तीन अर्धशतकांसह सर्वाधिक २०४ तर मेंडीसने दोन अर्धशतकांसह १३४ धावा केल्या होत्या.