विंडीजने झिंबाब्वेला हरविले

0
117
HARARE, ZIMBABWE - MARCH 19: Brendan Taylor of Zimbabwe looks on as Marlon Samuels of The West Indies scores runs during The Cricket World Cup Qualifier between The West Indies and Zimbabwe at The Harare Sports Club on March 19, 2018 in Harare, Zimbabwe. (Photo by Julian Herbert-IDI/IDI via Getty Images)

वेस्ट इंडीजने आपल्या पाचव्या सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना काल सोमवारी झिंबाब्वेचा पराभव केला. विश्‍वचषक पात्रता स्पर्धेतील ‘सुपर सिक्स’ फेरीचा हा सामना हरारे मैदानावर खेळविण्यात आला. झिंबाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २८९ धावा फलकावर लगावल्यानंतर विंडीजने ४ गडी व ६ चेंडू राखून विजय साकार केला.

ब्रेंडन टेलरच्या दहाव्या वनडे शतकामुळे झिंबाब्वेला तीनशे धावांच्या जवळपास जाता आले. टेलरने केवळ १२४ चेंडूंत २० चौकार व २ षटकारांसह १३८ धावा जमवल्या. पहिले दोन गडी लवकर बाद झाल्यानंतर तसेच बाऊन्सर आदळल्यामुळे सोलोमन मिरे याला मैदान सोडावे लागल्यामुळे झिंबाब्वेचा संघ संकटात सापडला होता. टेलरने यानंतर क्रेग एर्विन (१४), शॉन विल्यम्स (३४), सिकंदर रझा (२२) यांना साथीला घेऊन लहान-मोठ्या भागीदार्‍या रचताना खराब चेंडूंचा वेळोवळी समाचारदेखील घेतला. वेस्ट इंडीजकडून जेसन होल्डरने ३५ धावांत ४ गडी बाद केले. किमार रोचने ५५ धावांत ३, किमो पॉलने ५५ धावांत २ गडी बाद केले. आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजला ख्रिस गेल (१७) याला लवकर गमवावे लागले. इविन लुईस व शेय होप यांनी दुसर्‍या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केली.

लुईस ६४ धावा करून तंबूत परतल्यानंतर होप (७६) व मार्लन सॅम्युअल्स (८६) यांनी तिसर्‍या गड्यासाठी १३५ धावा जोडत संघाला २४५ पर्यंत नेले. २ बाद २४५ अशा भक्कम स्थितीतून विंडीजचा डाव ६ बाद २६५ असा गडगडला परंतु, रोव्हमन पॉवेल (१५) व ऍश्‍ले नर्स (८) यांनी नाबाद राहत संघाला विजयी केले. सुपर सिक्स फेरीत विंडीजचा संघ ४ सामन्यांतून ३ विजय व १ पराभवासह ६ गुण घेत पहिल्या क्रमांकावर आहे.