राज्यातील खाण बंदी प्रश्नी स्थानिक लोकप्रतिनिधी, खाण अवलंबित, खाण मालक, ट्रक, बार्ज मालक व इतरांचे विचार जाणून घेण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री तथा गोवा प्रभारी नितीन गडकरी सोमवार १९ रोजी रात्री ८ वाजता गोव्यात दाखल होणार आहेत. ते २० रोजी दिवसभरात खाण उद्योग क्षेत्रातील विविध घटकांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
भाजपच्या तिन्ही खासदारांनी नवी दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन खाण बंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली होती. तसेच केंद्रीय मंत्री तथा गोवा प्रभारी गडकरी यांची भेट घेऊन स्थानिकांचे खाण बंदीसंबंधी विचार जाणून घेण्यासाठी गोव्याला भेट देण्याची विनंती केली होती.
केंद्रीय मंत्री गडकरी राज्यात दाखल झाल्यानंतर १९ रोजी भाजप आणि आघाडी सरकारच्या आमदारांची मते जाणून घेणार आहेत. मंगळवार २० रोजी दिवसभरात खाण मालक, बार्ज, ट्रक मालक, खाण अवलंबित व इतरांना भेटणार आहेत. तसेच अन्य पक्षाच्या नेत्यांना भेटीसाठी उपलब्ध असतील, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.
भाजप व घटक पक्षाच्या आमदारांकडून खाण प्रश्नी वेगवेगळी मते व्यक्त केली जात आहेत. काही आमदारांकडून खाणपट्ट्यांचा लिलाव करावा तर काही जणांकडून खाण महामंडळ स्थापन करावे, असे मत व्यक्त केले जात आहे. खाण महामंडळ की लिलाव याबाबत पक्ष संघटना अंतिम निर्णय घेणार आहे, असेही तेंडुलकर यांनी सांगितले.
महामोर्चा मागे घ्यावा : भाजप
खाण अवलंबितांच्या आज पणजी शहरातील नियोजित महामोर्चामुळे विद्यार्थी आणि लोकांची गैरसोय होणार असून ती टाळण्यासाठी महामोर्चा मागे घ्यावा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल केले. यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची उपस्थिती होती. भाजप आघाडी सरकारकडून खाण बंदी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विविध पर्यायांवर विचार चालविला आहे. खाण अवलंबितांच्या भावना सरकारच्या वतीने केंद्र सरकारपर्यंत पोचविल्या आहेत. खाण बंदी प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे खाण बंदीच्या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल, असेही खासदार तेंडुलकर यांनी सांगितले.