पोलिसांच्या दिमतीला स्पीड रडार गन

0
151

>> बेदरकार वेगावर आवर : १०० आल्कोमीटरची खरेदी

गोवा वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहन चालकांविरोधातील कारवाईला आणखीन गती देण्याच्या उद्देशाने नवीन चार लेसर स्पीड रडार गन आणि १०० आल्कोमीटरची खरेदी केली आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्यात भरधाव वाहन चालविणार्‍या वाहन चालकावर या लेसर स्पीड रडार गनच्या साहाय्याने कारवाई केली जाणार आहे. राज्यातील विविध भागात भरधाव वाहन चालविण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. पोलीस वाहनात लेसर स्पीड रडार गन बसविण्यात आली आहेत. ही वाहने विविध ठिकाणी ठेवून वाहनांची गती तपासणी जाणार आहे. रडार गन खरेदीसाठी ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या रडारच्या माध्यमातून जास्त गतीने वाहने चालविणार्‍यांना दंड ठोठावला जाणार आहे. वाहन चालविण्याचा परवाना तीन महिन्यासाठी स्थगित करण्यासाठी वाहतूक खात्याकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती महासंचालक चंदर यांनी दिली.

दारूच्या नशेत वाहन चालविणार्‍याविरोधात कारवाईला गती देण्यासाठी नवीन १०० आल्कोमीटर खरेदी करण्यात आले आहेत. आल्कोमीटर खरेदीवर २९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. दारूच्या नशेत वाहन चालविणार्‍यांचे परवाने स्थगित करण्यासाठी वाहतूक खात्याकडे पाठविण्यात येणार आहेत. सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहने चालवावीत, असे आवाहन पोलीस महासंचालक चंदर यांनी केले. पत्रकार परिषदेला पोलीस वाहतूक विभागाचे अधीक्षक दिनराज गोवेकर यांची उपस्थिती होती.