स्कॉटलंड ‘सुपर सिक्स’ फेरीत

0
122

स्पर्धेतील आपला सलग तिसरा विजय नोंदवून काल गुरुवारी स्पर्धेच्या ‘सुपर सिक्स’ फेरीत स्थान मिळविले. स्कॉटलंडने काल नेपाळचा ४ गडी व ५१ चेंडू राखून पराभव केला. विजयासाठी मिळालेले १५० धावांचे माफक लक्ष्य स्कॉटलंडने ४१.३ षटकांत ६ गडी गमावून गाठले. १३६ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८८ धावांची खेळी करणारा स्कॉटलंडचा कर्णधार काईल कोएट्‌झर सामन्याचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर नेपाळकडून पारस खडका (६३) याचा अपवाद वगळता एकालाही धावांची पंचविशी ओलांडता आली नाही. सामन्यातील १४ चेंडू शिल्लक असताना त्यांचा डाव संपला. स्कॉटलंडकडून व्हिटिंघॅम याने सर्वाधिक ३ गडी बाद केले. धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडचे गडी ठराविक अंतराने बाद होत राहिले. परंतु, कोएट्‌झरने एक टोक सांभाळताना धावा जमविल्याने त्यांचा विजय शक्य झाला. नेपाळचा हा या स्पर्धेतील दुसरा पराभव ठरला. सुपर सिक्स फेरीसाठी ‘ब’ गटात चुरस वाढली असून उर्वरित दोन जागांसाठी झिंबाब्वे, हॉंगकॉंग, अफगाणिस्तान व नेपाळ यांच्यात चुरस आहे.

विंडीजचा एकतर्फी विजय
वेस्ट इंडीजने पीएनजीला ६ गड्यांनी नमवून स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळविला. कर्णधार जेसन होल्डरच्या (नाबाद ९९) याने शेय होप (नाबाद ४९) याच्यासह पाचव्या गड्यासाठी १४३ धावांची नाबाद भागीदारी केली. तत्पूर्वी, विंडीजने कार्लोस ब्रेथवेटने केवळ २७ धावांत घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर पीएनजीचा डाव ४२.२ षटकांत २०० धावांत गुंडाळला होता.

नेदरलँड्सला धक्का
संयुक्त अरब अमिरातीने सनसनाटी निकालाची नोंद करताना नेदरलँड्‌सवर ६ गडी व ३६ चेंडू राखून मोठा विजय मिळविला. चिराग सुरी याने ७८ धावांची समयोचित खेळी करत युएईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याच्यामुळे युएईने १७७ धावांचे लक्ष्य ४४ षटकांत गाठले. तत्पूर्वी, रोहन मुस्तफाच्या धारधार गोलंदाजीसमोर नेदरलँड्‌सचा डाव ४६.३ षटकांत १७६ धावांत संपला. रोहनने २६ धावांत ५ गडी बाद केले. ‘अ’ गटात आयर्लंड, विंडीज व युएई यांचे समान ४ गुण झाले आहेत. परंतु, युएईने एक सामना अधिक खेळला आहे.

अफगाणिस्तानच्या पराभवांची हॅट्‌ट्रिक
विश्‍वचषक पात्रता फेरीतील अफगाणिस्तानचा खराब फॉर्म कालदेखील कायम राहिला. तुलनेने दुबळ्या हॉंगकॉंग संघाकडून त्यांना काल डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ३० धावांनी पराभव मान्य करावा लागला. हॉंगकॉंगने प्रथम फलंदाजी करताना अंशुमन रथ (६५) तसेच निझाकत खान (२८), बाबर हयात (३१) या आघाडी फळीतील फलंदाजांबरोबरच मॅकेचनी (२४), वासिफ (२१), बरकत (नाबाद १८) व अफझल (२२) यांच्या उपयुक्त योगदानामुळे ५० षटकांत ८ बाद २४१ अशी आव्हानात्मक धावसंख्या रचली. नदीम अहमद (२ बळी) व अहसान खान (४ बळी) यांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांना रोखतानाच हॉंगकॉंगला विजयी केले. पावसामुळे अफगाणसंघासमोर विजयासाठी ४६ षटकांत २२६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. परंतु, त्यांचा संघ ९ बाद १९५ धावाच करू शकला.