भारत-लंका आज लढत

0
112

निधास करंडक तिरंगी टी-२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून भारत व श्रीलंका यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. भारताने या मालिकेसाठी आपल्या काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली असून श्रीलंकेचा संघदेखील अँजेलो मॅथ्यूज, असेला गुणरत्ने व शेहान मधुशंका यांच्याविना स्पर्धेत उतरणार आहे.

कोहलीच्या अनुुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार्‍या रोहित शर्मावर सर्वाधिक दबाव असेल. दक्षिण आफ्रिकेतील टुकार कामगिरीनंतर त्याला सूर गवसणे भारतासाठी गरजेचे आहे. तीन फिरकीपटू घेऊन भारतीय संघ उतरण्याची शक्यता फार कमी असून अनुभवाला प्राधान्य दिल्यास अक्षर पटेल व युजवेंद्र चहल यांना पहिली पसंती मिळू शकते. पाचव्या गोलंदाजाच्या जागेसाठी वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा व विजय शंकर यांच्यात चुरस असेल. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे लोकेश राहुलला मधल्या फळीत संधी मिळणे अपेक्षित आहे.

यष्टिरक्षकाच्या जागेसाठी दिनेश कार्तिक व ऋषभ पंत यांच्यातील एकाची निवड करावी लागेल. मागील लंका दौर्‍यात भारताने सर्व नऊ सामने जिंकेल होते. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. श्रीलंकेचा संघ बांगलादेशमध्ये मालिका जिंकून आलेला आहे. संघात नवोदितांचा भरणा असला तरी त्यांचा संघ बर्‍यापैकी स्थिरावला आहे. सलामीला येऊन कुशल मेंडीसने बांगलादेशमध्ये स्फोटक खेळी केल्या होत्या. मधल्या फळीत शनका व थिसारासारखे टी-२० स्पेशलिस्ट आहेत. त्यामुळे अनुभवाची कमतरता असलेल्या भारतीय संघाला श्रीलंकेच्या संघाला कमी लेखून चालणारे नाही.
भारत संभाव्य ः रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना, मनीष पांडे, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट व युजवेंद्र चहल.

श्रीलंका संभाव्य ः कुशल मेंडीस, दनुष्का गुणथिलका, कुशल परेरा, उपुल थरंगा, दासुन शनका, थिसारा परेरा, दिनेश चंदीमल, अकिला धनंजया, अमिला अपोन्सो, दुष्मंथ चमीरा व सुरंगा लकमल.