- वैदू भरत नाईक
वितभर छातीची तरुण मुले-मुली थोड्याशा श्रमाने ‘फा-फू’ होणारी, टिपटॉप कपड्यातील टिपटॉप मुले छातीच्या फुप्फुसाच्या विकाराकरीता औषधे मागतात तेव्हा त्यांची कीव वाटते. फुफ्फुसाचे रोग काही कारणाने होणे ही निराळी गोष्ट, पण बहुतांशी फुफ्फुसाचे विकार हे व्यायाम, मोकळी हवा, खेळ यांच्या अभावामुळे तरुण मुलामुलींना होतात. गरीबीमुळे कोंदट अंधार्या हवेत रहावे लागणे मी समजू शकतो, त्याने फुफ्फुसाचे रोग होतात. पण आपल्या घराबाहेर फिरणे, व्यायाम जमू शकते. घरात दीर्घ श्वसन, सूर्यनमस्कार, जोर काढणे या क्रिया फुफ्फुसाच्या हिताकारिता सहज करता येतात. त्याकरिता ‘जीम’मध्ये जाण्याची गरज नाही.
कारणे …
– अनुवंशिकता, जन्मानंतर हयगय, ताप, सर्दी, पडसे असे विकार बालकांना होणे.
– कोंदट, अपुरा उजेड व हवा असलेल्या घरात राहणे.
– व्यायाम, हालचाल, खेळ यांचा अभाव असणे.
– रागराग करणे, चिडचिड करणे, खाल्लेले अन्न अंगी लागू न देणे
– कृमी, जंत, मुडदूस, पोटाचा डबा या विकारांमुळे छातीच्या पिंजर्यावर परिणाम होतो,
लक्षणे …
* थोड्याशा त्रासाने धाप लागणे, फा-फू होणे
* जिन्यांची जास्त चढ-उतार केल्याने श्वास लागणे,
* फुफ्फुसाच्या ठरावीक जागी दुखणे
* हवा किंवा पाणी यात थोडा बदल झाला, गारठा वाढला की सर्दी, पडसे, दम हे विकार होतात.
* जोरात पळताना दम लागणे.
शरीर परीक्षण …
फुप्फुसाचा घेर हा माणसाच्या वयावर, उंचीवर व एकूण परिस्थितीवर अवलंबून असतो. वयात आलेल्या माणसास फुप्फुसाचा घेर वाढवण्यास संधी असते. त्याकरिता छाती न फुगवता व फुगवून अशा दोन्ही प्रकारे मोजमाप नोंदवून ठेवावे. दर तीन महिन्यांनी तपासावे. नाडी व श्वसनाच्या विषयी नोंद करावी. त्यात कमीजास्त मात्रा आहे त्याप्रमाणे उपाययोजना करता येते. छातीत कफ, चिकट, कुई कुई आवाज आहे का ते पहावे. छातीच्या हाडाच्या पिंजर्याच्या रचनेत दोष लहानपणीच लक्षात आला तर योग्य उपचार करता येतात.
अनुभविक उपचार …
– दीर्घ श्वसन, प्राणायाम हे उपचार तज्ञांकडून समजून घ्यावे व नियमितपणे करावे. छातीचा घेर वर्षांत वाढतो.
– सूर्यनमस्कार व जोर काढणे हा व्यायाम नित्य करावा. शक्यतो रोज पोहावयास जावे.
– छातीचा घेर वाढण्याकरिता सुवर्णमक्षिकादिवटी व शृंगभस्म प्रत्येकी तीन गोळ्यासकाळी व सायंकाळी रिकाम्या पोटी घ्याव्यात. शतावरी कल्प तीन चमचे एक कप गरम दुधात मिसळून घ्यावा.
– हृदयाच्या स्नायूंचा संबंध आहे असे वाटल्यास फुफ्फुसात हृदयाच्या जागी ठरावीक ठिकाणी दुःख असल्यास राजकषाय काढा किंवा अर्जुनारिष्ट दोन्ही जेवणानंतर चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे.
– कृश, मांस, कामी छाती वितभर अशा कारणांनी फुफ्पुसाच्या विचाराचे मूळ आहे असे ठरल्यास अश्वगंधापाक सकाळी व सायं. रिकाम्या पोटी दोन चमचे घ्यावे.
– लहान बालकांस फुफ्फुसाच्या तक्रारीमुळे धाप लागली असल्यास सांबर शिंगाचा तुकडा पाण्यात सहाणीवर उगाळून ते चमचाभर गंध पोटात घ्यावे. फुप्फुसाच्या विकारात सर्दी, पडसे, ताप या तक्रारी असल्यास लक्ष्मी-नारायण प्रत्येकी तीन गोळ्या दोन्ही वेळा बारीक करून घ्याव्यात. खोकला असल्यास खोकला काढा चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावा.
– फुफ्फुसात बाजूंना सूज येते, पाणी होते, दुखणे सतत कोरडा खोकला, रात्री खोकला वाढतो. त्यामुळे झोप न येणे याकरिता एलादिवटी रोज एक-एक करून सहा ते आठ गोळ्या चघळून खाव्यात. भृंगराजासव दोन्ही जेवणानंतर समभाग पाण्याबरोबर घ्याव्यात.
पथ्यापथ्य –
वेळेवर पुरेसा आहार असावा. जेवण सावकाश चावून खावे. विश्रांती वेळच्या वेळी घ्यावी.
– किमान व्यायाम फुफ्फुसाची ताकद वाढविण्याकरिता करावा.
– आहारात कडधान्ये, पुदीना, लसूण, फळे, मिरी, दूध, तूप,. आवळा, आमसूल, जिरे, गहू असे सर्व रसात्मक पदार्थ असावेत.
– वातानुकूलित जागेत, गर्दीत, धुळीचे ठिकाणी जाणे टाळावे.
– खूप थंड, कफवर्धक, डालडा असलेले पदार्थ, फ्रीजचे पाणी, आईस्क्रीम पदार्थ खाऊ नयेत.