५४ हे काही या दुनियेतून निघून जाण्याचे वय नव्हे, परंतु अभिनेत्री श्रीदेवी यांनी कोणाच्या ध्यानी मनी नसताना अचानक या जगाचा निरोप घेतला. केवळ चित्रपटसृष्टीसाठीच नव्हे, तर त्यांच्या तमाम चाहत्यांसाठी हा फार मोठा धक्का आहे. कन्या जान्हवी लवकरच आपल्या आईच्या पावलांवर पाऊल टाकून ‘धडक’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. आपल्या मराठी ‘सैराट’ चे हे हिंदी रुपांतर आहे. मुलीच्या चित्रपट कारकिर्दीची अशी शानदार सुरुवात होत असतानाच आईचे अकाली आणि आकस्मिक निघून जाणे आणि तेही दूर दुबईमध्ये हे अधिक चटका लावणारे आहे. श्रीदेवी यांच्याविषयी काय सांगायचे! मागील काही पिढ्यांवर या नावाने अधिराज्य केले. कोणी मुलगी जरा तोरा दाखवू लागली की ‘स्वतःक किदे श्रीदेवी समजता?’ असे विचारले की क्षणात जमिनीवर उतरेल अशी उंची श्रीदेवी यांनी आपल्या आजवरच्या अभिनय कारकिर्दीत गाठलेली होती. एखाद्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने हिंदीचा गंधही नसताना बॉलिवूडमध्ये ही उंची गाठणे आणि विवाहानंतर जवळजवळ पंधरा वर्षांच्या अज्ञातवासानंतर पुनरागमनही तितक्याच झोकात करणे हे सारेच विलक्षण आहे. सत्तरच्या दशकात बालकलाकार म्हणून सुरू झालेली कारकीर्द, तामीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड अशा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये निर्माण केलेला दबदबा आणि त्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करून बघता बघता कोट्यवधी ह्रदयांची धडकन बनणे हा त्यांचा सारा प्रवास सोपा तर नक्कीच नव्हता. मूळच्या मोठ्या नाकावर प्लास्टिक सर्जरी करून त्यांनी त्याला आकर्षक रूप दिले. हिंदी येत नसल्याने सुरवातीच्या अनेक चित्रपटांमध्ये संवाद डब करावे लागायचे. पण अतिशय बोलके डोळे आणि लवचिक हालचालींनी हिंदी चित्रपटसृष्टीवर अशी काही जादू त्यांनी केली की श्रीदेवी हे नाव बघता बघता घराघरांत जाऊन पोहोचले. कोण कुठली दक्षिणेतील शिवकाशीची श्रीअम्मा अय्यप्पन ‘श्रीदेवी’ बनून कोट्यवधींच्या मनोरथांची प्रेरणा ठरली. शाळांच्या स्नेहसंमेलनांमधून त्यांच्या ‘हवा हवाई’, ‘मोरनी’, ‘मेरे हाथोंमे नौ नौ चुडियॉं’, ‘मै तेरी दुष्मन’ या सारख्या गाण्यांवर किती मुली नाचल्या असतील याची तर गणतीच नसेल. श्रीदेवीजींनी आजवर तीनशेहून अधिक विविध भाषक चित्रपटांमधून कामे केली असतील, पण हिंदीमध्ये त्यांची नटखट, विनोदी प्रतिमा मुख्यतः निर्माण झाली ती ‘चांदनी’, ‘मिस्टर इंडिया’ सारख्या चित्रपटांतून. पण केवळ अशा हलक्या फुलक्या भूमिकांपुरतीच त्यांची अभिनयक्षमता मर्यादित नव्हती. ‘सदमा’ पासून अलीकडच्या ‘इंग्लीश विंग्लिश’ आणि ‘मॉम’ पर्यंतचा त्यांचा कसदार अभिनय पाहिला तर एवढा प्रदीर्घ काळ हे नाव रसिकांच्या स्मरणात का राहू शकले याचे उत्तर मिळून जाते. श्रीदेवी यांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांनी अभिनीत केलेली गाणी आणि नृत्ये हाही एक स्वतंत्र इतिहास आहे. पडद्यावरचा त्यांचा प्रसन्न वावर रसिकांना स्वप्नांच्या दुनियेमध्ये विहरून आणल्याशिवाय राहायचा नाही. नव्वदच्या दशकात एका चित्रपटासाठी एक कोटी रुपये घेणार्या त्या एकमेव अभिनेत्री होत्या. मूळचा बुजरा, मितभाषी स्वभाव, चिरका आवाज, टिपिकल दाक्षिणात्य चेहरा, त्यात सफाईदार हिंदी, इंग्रजीचा अभाव हे सगळे असूनही श्रीदेवींची जादू का चालली असेल? अर्थात सशक्त अभिनय हे त्याचे एकमेव उत्तर मिळते. कधी चटपटीत, कधी नटखट, कधी भेदक, कधी मादक अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये श्रीदेवी चंदेरी पडद्याला व्यापून राहिल्या. रजनीकांतपासून अमिताभपर्यंत आणि कमल हसन पासून अनिल कपूर, जितेंद्रपर्यंत नानाविध व्यक्तिमत्वाच्या आणि शैलीच्या अभिनेत्यांसमवेत त्यांनी काम केले, काळाचा विचार केला तर केवढा प्रदीर्घ असा तो सारा कालखंड आहे. त्यातही वेगवेगळे टप्पे आहेत. १९६७ ते ७५ हा बालकलाकार म्हणून दाक्षिणात्य चित्रपटांमधील सुरवातीचा काळ, ७५ ते ८२ हा दाक्षिणात्य चित्रपटांतील प्रमुख भूमिकांचा काळ, ८३ ते ९७ मधली बॉलिवूडची कारकीर्द. त्यानंतर काही काळ विवाहानंतरचा विजनवास. मग दूरचित्रवाणी मालिकांमधला थोडाफार वावर आणि शेवटी २०१२ पासून ‘इंग्लिश विंग्लीश’, ‘मॉम’ मधून झालेले अतिशय दमदार, झोकदार पुनरागमन. आता मुलीची चित्रपट कारकीर्द उभी राहात असतानाच त्या आपल्यातून अकाली निघून गेल्या आहेत. नियती म्हणतात ती हीच. देशाला कोट्यवधींचा गंडा घालणारे लुटारू विदेशांमध्ये सुखाने, चैनीत जगत असतात आणि आपल्या मेहनतीने आयुष्य उभे करणारी आणि सदैव इतरांच्या जीवनामध्ये आनंद पसरविणारी श्रीदेवींसारखी सर्वांना हवीहवीशी वाटणारी माणसे मात्र नियती आपल्यातून अकल्पितपणे ओढून नेते. कलियुग म्हणतात ते हेच!