कलेला शिस्तीची चौकट घालता कामा नये, कारण कला ही शेवटी कला असते. कलाकारांच्या कल्पनाशक्तीवर तिचा आविष्कार घडत असतो. त्याच्या पद्धतीने अभिव्यक्त व्हायला कलाकाराला स्वातंत्र्य हवे. कला ही कलाकाराचे स्वातंत्र्य, कल्पना, रसिकांचा सहभाग याच्याशी संबंधित असते. विचारांच्या पलीकडेही कलेची अभिव्यक्ती होते ती समजून घ्यायल हवी, असे मत चित्रकार तथा लेखक डॉ. सुधीर पटवर्धन यांनी येथे व्यक्त केले.
कला व संस्कृती संचालनालयातर्फे कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात सुरू असलेल्या डी. डी. कोसंबी व्याख्यानमालेत समारोपाचे पुष्प आज सुधीर पटवर्धन यांनी गुंफले. ‘व्हॉट इज टुडेज आर्ट अबाऊट’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. ते म्हणाले, मी स्वतः पेशाने डॉक्टर. परंतु या पेशात अनेकांकडे संबंध आला व माझ्यातील कलाकार घडत गेला. स्वातंत्र्यापूर्वी नाट्य, साहित्य, चित्रकला आदी कला प्रकारांची शैली वेगळी होती व आता ती बर्याच प्रमाणात बदलेली आहे व ही चांगली बाब आहे. स्वतंत्रपणे कलेची अभिव्यक्ती करताना कलाकाराला अडथळे येता कामा नयेत.
भावना, घटना, सामाजिक प्रश्न याच्याशीही कलेची अभिव्यक्ती निगडीत असते याकडे निर्देश करून डॉ. पटवर्धन यांनी सांगितले की, कलेशी आजही माणसाचे नाते घट्ट आहे कारण कला माणसाचे जीवन आनंदी करते.
डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाला प्रत्येक वर्षी व्याख्याने ऐकण्यासाठी लोक तुडुंब गर्दी करायचे. मा. दीनानाथ कला मंदिराबाहेरही पडद्यावर व्याख्यान ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने जमलेले दिसायचे. परंतु यंदा प्रथमच भरघोस प्रतिसादाअभावी ही व्याख्यानमाला पार पडली. कला मंदिराबाहेर ‘स्क्रीन’ची पण गरज भासली नाही. यंदाचे वक्तेही रसिकांवर प्रभाव पाडू शकले नाहीत अशी चर्चा ऐकू येत होती.