‘ब्रेक्झिट‘ ही मोठी चूक आहे. त्यात सहा पटींनी गुंतवणूक केली जाते. मात्र त्यातून शून्य निष्पत्ती होते. ‘ब्रेक्झिट’ म्हणजे मंद गतीने क्रॅश होणारी ट्रेन आहे, असे प्रतिपादन लॉर्ड करण बिलिमोरिया यांनी काल डी. डी. कोसंबी विचार महोत्सवातील आपल्या व्याख्यानात केले.
‘ब्रेक्झिट’च्या संदर्भात ‘भारत, ब्रिटनचे भवितव्य आणि युरोपियन समुदाय संबंध यावर पारसी दृष्टीक्षेप’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. आपण लॉर्ड हाऊसमध्ये प्रवेश केला तेव्हा दादाभाई नवरोजींच्या व्याख्यानांचे वाचन केले. त्यामुळे मला प्रेरणा मिळाली असे ते म्हणाले.
यशस्वी उद्योजक बनण्यासाठी स्वतःमध्ये धमक असली पाहिजे. घेतलेल्या निर्णयात अपयश आले तरी हार न मानण्याची धमक यशस्वी उद्योजकात असते. यशस्वी होण्यासाठी चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करावा लागतो. अयोग्य मार्ग निवडून यशस्वी होण्यापेक्षा योग्य मार्ग निवडून अपयशी होणे केव्हाही चांगले, असे विचार त्यांनी मांडले.
यशस्वी होण्यासाठी चौकटीच्या बाहेर पडून सर्जनशील विचार करण्याची गरज असते. त्याचप्रमाणे आपण जे करतो त्यावर विश्वासाची गरज असते याची जाणीव देवून बिलिमोरिया म्हणाले, प्रत्येक मुलात सर्जनशीलता दडलेली असते त्या सर्जनशीलतेला त्याच वयात प्रोत्साहनाची गरज असते. त्यातून भविष्यात अनेक उद्योजक निर्माण होतील व देशाच्या ‘जीडीपी’तही दुप्पट वाढ होईल देशाच्या विकासासाठी औद्योगिक विकासाला प्रोत्साहनाची गरज आहे.
भारतीय असल्याचा अभिमान
मायभूमीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करतांना त्यांनी सांगितले की, मी भारताला सोडून परदेशात गेलो तरी भारताने मला सोडलेले नाही. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे.
दारूबंदी निर्णय अयोग्य
बिहार राज्यामध्ये झालेला दारूबंदीचा निर्णय अयोग्य आहे. दारूबंदीमुळे बेरोजगारी निर्माण झाली, महसूल बंद झाला, दुकाने बंद पडली. भविष्यात यावर काहीतरी तोडगा निघेल अशी आशा आहे.