फुटबॉलचे संचालन करणारी जगातील सर्वोच्च संस्था असलेल्या ‘फिफा’ने काल गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत विश्वविजेत्या जर्मनी संघाने आपला पहिला क्रमांक कायम राखला आहे. आघाडीच्या दहा संघांत कोणताही बदल झालेला नाही. अव्वल २० संघांचा विचार केल्यास आईसलँडने दोन स्थानांची प्रगती करत १८व्या क्रमांकावर हक्क सांगितला आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या दोन मित्रत्वाच्या सामन्यांत त्यांनी इंडोनेशियाचा पराभव केला होता.
ऑलिम्पिक चॅम्पियन ब्राझिल दुसर्या तर युरोपियन विजेता पोर्तुगाल तिसर्या क्रमांकावर आहे. उत्तर व मध्य अमेरिकन देशांमध्ये मेक्सिको १७व्या स्थानासह अव्वल आहे. आफ्रिकन देशांमध्ये ट्युनिशिया २६व्या स्थानासह प्रथम तर आशियातील अव्वल संघामध्ये ३३व्या स्थानावरील इराणचा नंबर लागतो. मागील दोन वर्षांत केवळ मित्रत्वाचे सामने खेळलेला विश्वचषकाचा यजमान देश रशिया ६१व्या स्थानी आहे. फिफा क्रमवारी टॉप १० ः १. जर्मनी (१६०२ गुण ), २. ब्राझिल (१४८४), ३. पोर्तुगाल (१३५८), ४. अर्जेंटिना (१३४८), ५. बेल्जियम (१३२५), ६. स्पेन (१२३१), ७. पोलंड (१२१३), ८. स्वित्झर्लंड (११९०), ९. फ्रान्स (११८३), १०. चिली (११५३)
भारताचे १०२वे स्थान कायम
भारतीय संघ ३३३ गुणांसह १०२व्या स्थानावर आहे. मागील क्रमवारीतही भारत याच स्थानावर होता. २११ संघांच्या या क्रमवारीत पाकिस्तानचा २०३वा क्रमांक लागतो. आशियाई फुटबॉल कॉन्फडरेशनमधील देशांमध्ये भारताचा १४वा क्रमांक लागतो.