कोलवाळ तुरुंगात मद्यधुंद कैद्यांसह जेलगार्डचाही दंगा

0
88

>> उलट्यांमुळे इस्पितळात रवानगी

कोलवाळ येथे असलेल्या केंद्रीय मध्यवर्ती कारागृहात महाशिवरात्री दिवशी जेलगार्ड व कैद्यांनी भांग पिऊन दंगामस्ती करण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडल्याचे उघडकीस आले आहे. अती प्रमाणात भांग प्राशन केल्यानंतर उलट्या सुरु झाल्याने जेलगार्ड किरण नाईक तसेच मयडे येथील खूनी हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेले सुरेश उर्फ बाबू आरोलकर व विनय गडेकर या तिघांना तातडीने उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्याची पाळी कारागृह प्रशासनावर आली.

कोलवाळ येथे असलेल्या केंद्रीय कारागृहात मंगळवारी रात्री कर्मचारी व कैद्यांनी भांग पिऊन दंगामस्ती करण्याचा प्रकार घडला. अती प्रमाणावर भांग प्राशन केल्याने जेलगार्ड व कैद्यांना नंतर उलट्या सुरु झाल्या. लागलीच त्यांना उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे जेलगार्डला दाखल करुन घेण्यात आले, तर इतर दोन कैद्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली. उपचारानंतर विनय गडेकर याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सुरेश आरोलकर याच्यावर अजूनही उपचार चालू आहेत.

भांगेची बाटली जप्त
सदर प्रकारानंतर तुरुंग अधीक्षक नारायण प्रभूदेसाई यांनी एक बाटली जप्त केली असून त्यात भांग असल्याचे आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पण उपलब्ध झालेल्या अधिक माहितीनुसार अधीक्षकांनी आपल्या अहवालात सापडलेल्या बाटलीत पांढर्‍या रंगाचे रसायन असल्याचे म्हटले आहे. ते या तिघांनी प्राशन केल्याने सदरचा प्रकार घडला.

उपचारासाठी दाखल करण्यात आलेले दोन्ही गुन्हेगार सुरेश उर्फ बाबू आरोलकर व विनय गडेकर यांच्यावर मयडे येथे एका इसमावर खूनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला असून या प्रकरणात त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देऊन त्यांची रवानगी कोलवाळ येथील कारागृहात करण्यात आली होती. या दरम्यान हा प्रकार घडला. या बाबत म्हापसा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी माहिती देताना सांगितले की, सदर प्रकार कसा घडला या प्रकरणी आम्ही सीसीटीव्ही फूटेज व इतर वस्तूंची तपासणी करून तपास कार्याला सुरुवात केलेली आहे. सदर रसायन अन्न औषध प्राधीकरणाच्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. अहवालानंतर त्या बाटलीत नेमके काय होते हे स्पष्ट होणार आहे. सदर घटनेची तक्रार साहाय्यक अधीक्षक सत्यवान तारी यांनी म्हापसा पोलिसांत दिली असून पुढील तपास साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के.टी. गावस करीत आहेत. सुमारे दोन वर्षा पूर्वी सुरु करण्यात आलेल्या या कारागृहाच्या उद्घाटनानंतर अनेक घटना घडल्या आहे. अश्फाक बेंग्रे सारख्या नामवंत गुडांचा याच कारागृहात खून करण्यात आलेला. तसेच कैद्यांनी कारागृहात हैदोस घालण्याचे अनेक प्रकारही इथे घडले आहेत.