शिक्षण संस्कृतीची निर्मिती आवश्यक : रामचंदानी

0
85

एकविसाव्या शतकामधील शिक्षण क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी शिक्षण संस्कृतीची निर्मिती करणे आवश्यक आहे. तसेच शिक्षणाबाबतची आपली वृत्ती, मूल्य आणि वर्तवणुकीत बदल करण्याची गरज आहे. शिक्षणामध्ये मल्टिपल रिस्पॉन्सचा स्वीकार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विज्ञान शिक्षक, उद्योजक, क्युरेटर जया रामचंदानी यानी काल केले.

कला अकादमीच्या आवारात आयोजित ११व्या डी.डी. कोसंबी विचार महोत्सवात दुसरे पुष्प जया रामचंदानी यांनी गुंफले. ‘एकविसाव्या शतकातील अध्ययनातला विरोधाभास’ असा रामचंदानी यांच्या व्याख्यानाचा विषय होता. जया रामचंदानी यांनी शिक्षणाची एंकदर स्थिती, शिक्षणातील नवीन प्रयोगाबाबत सविस्तर विवेचन केले. एकविसाव्या शतकामध्ये सर्जनशिलता, विचारप्रवृत्त, प्रतिगमक, उत्कष्ठावर्धक शिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. तसेच या शिक्षणासाठी विविध संधी उपलब्ध करणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर अभियांत्रिकींच्या माध्यमातून रॉबोटीक्सचा शिक्षण, उद्योग, आरोग्य क्षेत्रात वापर होऊ लागला आहे. मनुष्याची कामे रॉबोटीक्सकडून करून घेतली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रात जेनेटीक्स मॅपींगचे प्रयोग सुध्दा केले जात आहेत, असेही रामचंदानी यांनी सांगितले.

स्टोरी ऑफ फाऊंडेशनतर्फे शिक्षणाच्या नवीन संधीचा अभ्यास करण्यासाठी ‘स्टडी ऑफ लाईफ’ आणि ’स्टडी ऑफ स्पेस’ हे दोन प्रकल्प पूर्ण केले आहेत. आता ‘स्टडी ऑफ माईंड’ हा तिसरा प्रकल्प लवकरच हाती घेण्यात येणार आहे, असे रामचंदांनी यांनी सांगितले.

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणातून मनुष्याचा सर्वांगिण विकास शक्य आहे. जुन्या काळात गोष्टीच्या माध्यमातून शिक्षण दिले जात होते. तसेच गुरूकुल पध्दतीने सुध्दा शिक्षण दिले जात होते. ही शिक्षण पध्दत मोजक्याच लोकांसाठी उपलब्ध होती. आधुनिक काळात शिक्षण पध्दतीत बदल झाला आणि होत आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय, विद्यापीठ आदी पातळ्यांवर शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी, व्यवसायाला सुरूवात केली जाते, असेही रामचंदानी यांनी सांगितले.