गोवा डेअरीच्या व्यवहारात करोडो रुपयांचा घोटाळा झाला असून सहकारमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लक्ष घालून गोवा डेयरीवर प्रशासक नेमण्याची मागणी सत्य शोधक चौकशी समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद सावर्डेकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेस विकास प्रभू, वैभव परब,पामेश नाईक व जयंत देसाई उपस्थीत होते. गोवा डेअरीला दरवर्षी होणारे नुकसानाची सखोल चौकशी करण्यासाठी दि २८ सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभेत सत्यशोधक समितीची निवड करण्यात आली होती. या समितीत सात सदस्यांची निवड करण्यात आली होती. मात्र समितीने दि २० ऑक्टोबर रोजी चौकशी करण्यात सुरु केली असता पशूखाद्य प्रकल्प, नोकर भरती, औषधें, व अन्य व्यवहारात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे पुरावे समितीच्या हाती लागले. मात्र गोवा डेअरीने घोटाळा उघड होणार या भीतीने समितीला दि २५ ऑक्टोबर रोजी स्थगिती देऊन चौकशी थांबविण्यास सांगितले. घोटाळ्या संबंधी सर्व माहिती सहकार मंत्र्यांना देण्यात आली असून गोवा डेअरीच्या भवितव्यासाठी सत्यशोधक चौकशी समितीला अधिक पुरावे गोळा करण्यासाठी परवानगी मिळणे गरजेचे असल्याचे सावर्डेकर यांनी सांगितले. गोवा डेअरीच्या घोटाळा प्रकरणी संपूर्ण चौकशी करण्याची गरज आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष घालून गोवा डेअरीचा कारभार सुधारण्यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे सावर्डेकर यांनी सांगितले.
घोटाळा नाही : सहकारी
दरम्यान गोवा डेअरीचे अध्यक्ष माधव सहकारी यांनी गोवा डेअरीत कोणताही घोटाळा झाला नसून चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. सर्व साधारण सभेत जरी समिती निवडली तरी सहकार निबंधकाने सदर समिती कायदेशीर नसल्याचे कळविल्यानंतर महत्वाची कागदपत्रे त्या समितीकडे देण्यात आली नाही. सहकार निबंधकाने परवानगी दिल्यास संचालक मंडळ सहकार्य करण्यास तयार असल्याचे माधव सहकारी यांनी सांगितले.