गोवा फॉरवर्डने पुतळ्याचा विषय भाजपला विकला

0
201

>> सरदेसाईंनी स्पष्टीकरण द्यावे : कॉंग्रेस

गोवा फॉरवर्डने ग्रेटर पणजी पीडीएचे अध्यक्षपद आणि चार फाईल्ससाठी जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्याचा विषय भाजपला विकला आहे, असा आरोप अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे सचिव गिरीश चोडणकर यांनी कॉँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल केला.

गोवा फॉरवर्डने पुतळा उभारण्याच्या नावाखाली डॉ. जॅक सिक्वेरा यांचा अपमान केला आहे. गोवा फॉरवर्डने जानेवारी महिन्यात मडगाव येथील जनमत कौल दिनानिमित्त आयोजित सभेत जॅक सिक्वेरा यांच्या पुतळ्यासाठी कुठल्याही थरावर जाण्याचा दिलेला इशारा अखेर हवेत विरला आहे. सिक्वेरा यांच्या पुतळ्याच्या प्रश्‍नावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा मंत्री विजय सरदेसाई यांनी स्पष्टीकरण करण्याची गरज आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.

राज्यातील पुतळ्याचा विषय एक नाटक असल्याचा आरोप अखेर खरा ठरला आहे. या नाटकात भाजप आघाडी सरकारमधील प्रत्येक घटक पक्षांनी आपली भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. पुतळ्याचा विषय कामकाजात समाविष्ट न करणे आणि ग्रेटर पीडीएचे अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणा एकाच दिवशी होणे निव्वळ योगायोग आहे का ? असा प्रश्‍न चोडणकर यांनी उपस्थित केला.

ग्रेटर पणजी म्हणजे घोटाळा
ग्रेटर पणजी पीडीए हा मोठा घोटाळा आहे. गोयंकारपणाच्या गोंडस नावाखाली जमिनी बांधकाम व्यावसायिकांना विकण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. पर्रीकर यांनी पीडीएच्या स्थापननेसाठी एकावेळी विरोध केला होता. आता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या डोळ्यासमोर पीडीएमध्ये घोटाळा निश्‍चित आहे. ग्रेटर पीडीए म्हणजे पैसा व भ्रष्टाचाराचे कुरण बनणार आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मोन्सेरात यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली होती. त्याच मोन्सेरात यांची ग्रेटर पीडीएच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्रीकर यांनी आत्तापर्यंत घोटाळ्यात अडकलेल्या अनेकांचे शुध्दीकरण केलेले आहे. मात्र, मोन्सेरात यांचे शुध्दीकरण केल्याचे वाचनात आलेले नाही, असेही चोडणकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात अनेक वादग्रस्त राजकारण्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी त्यातील अनेकांचे शुध्दीकरण केलेले आहे. पर्रीकर यांच्या मंत्रीमंडळात वादग्रस्त राजकारण्यांच्या सहभागामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे, असा दावा चोडणकर यांनी केला.