>> कोसंबी विचार महोत्सवात मकरंद साठे यांचे प्रतिपादन
जागतिकीकरणाच्या युगात राष्ट्रवादाच्या नावाने द्वेषभावना पसरविण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून जगभरात आत्यंतिक देशाभिमानाची लाट पसरली आहे. भारतात तर सध्याच्या काळात घडणार्या घटनांबरोबरच इतिहासाचाही वापर राष्ट्रवादाच्या नावाने द्वेषभावना पसरविण्यासाठी केला जात आहे, असे सुप्रसिध्द साहित्यिक, रंगभूमी इतिहासकार व रंगकर्मी मकरंद साठे यानी काल डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात बोलताना सांगितले.
ब्रिटिश राजवटीत देशभरातील लोकांना एका छताखाली आणण्यासाठी राष्ट्रवादाचा समर्थपणे वापर करण्यात आला होता. मात्र आता त्याच राष्ट्रवादाचा द्वेषभावना पसरविण्यासाठी वापर केला जात असल्याचे साठे यानी अनेक उदाहरणे देऊन सांगितले. भीमा-कोरे हेही त्याचे एक जीवंत उदाहरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादाच्या नावाखाली समाजात फूट पाडली जात असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत असल्याचे सांगतानाच आपण राष्ट्रवादाचा द्वेष अथवा निषेध करीत आहे असा अर्थ मात्र कुणी काढू नये, असेही साठे यानी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रीय पुरुषांचाही राष्ट्रवादाच्या नावाने द्वेषभावना पसरविण्यासाठी वापर केला जात असून टिपु सुलतान, शिवाजी, आंबेडकर आदी नेत्यांचा त्यासाठी वापर केला जात असल्याची उदाहरणे आहेत.
हे करू नका ते करू नका असे सांगून धर्माच्या व संस्कृतीच्या नावाने बर्याच गोष्टींवर बंदीही घातली जाऊ लागली असल्याचे साठे म्हणाले. जागतिकीकरणाचा विचार करताना अर्थ व्यवस्था आणि मनुष्यबळ याचा जसा विचार केला गेला तसा संस्कृतीचा विचार केला गेला नसल्याचे सांगतानाच कुठल्याही राष्ट्राची केवळ एकच संस्कृती असू शकत नाही. छोटी छोटी राष्ट्रेसुध्दा त्याला अपवाद नाहीत. मग भारतासारख्या राष्ट्रात जेथे कित्येक धर्म आणि जाती व पंथ आहेत तेथे केवळ एक संस्कृती कशी असू शकेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भारतात केवळ हिंदू संस्कृतीच असल्याचा वाद निर्माण करण्यात आल्याचे ते म्हणाले. जागतिकीकरणाच्या पूर्वीही जगभरात रंगभूमीला विशिष्ट गटांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आता जागतिकीकरणाच्या काळातही ही स्थिती बदललेली नसून आताही ही सेन्सॉरशीप अस्तित्वात आहे. संपूर्ण जगभरात रंगभूमी विरुध्द वातावरण आहे, असे साठे म्हणाले.
राष्ट्रवादाच्या नावाने राजकीय पक्षांकडून हिंसा
जागतिकीकरणाच्या काळात राष्ट्रवादाच्या नावाने राजकीय पक्षांनी सरळ सरळ हिंसा करण्याचे काम हाती घेतले असल्याचा आरोपही साठे यांनी केला. त्यासाठी कधी लव्ह जिहादचा उल्लेख करणे, अफवा पसरविणे असे करण्याबरोबरच सीबीआयसारख्या संस्थांचाही वापर केला जाऊ लागला आहे. अशा प्रवृत्तींमुळेच देशातील काही बुध्दीजीवी लोकांच्या हत्या झाल्याचे ते म्हणाले. प्रत्यक्ष जाऊन हत्या करणारा, ती घडवून आणणारा व त्याचे समर्थन करणारे असे हिंसा करणार्यांचे तीन स्तर आहेत. ही सामाजिक हिंसा आहे. जागतिकीकरणाच्या युगात सांस्कृतिक दारिद्य्रही निर्माण होऊ लागले असल्याचेही साठे म्हणाले. समाजामध्ये होऊ लागलेले विघटन व संवादाचा अभाव हे ह्या सांस्कृतिक दारिद्य्रामागील मुख्य कारण असल्याचे साठे यानी स्पष्ट केले. समाजामध्ये असलेले विघटन एवढे आहे की कोण कोणाच्या बाजूने व कोण कोणाच्या विरोधात हे कळू शकत नसल्याचे ते म्हणाले.
धर्म-संस्कृतीचा बाजार
जागतिकीकरणाच्या ह्या युगात धर्म आणि संस्कृती यांचा बाजार मांडण्यात आलेला असून त्यांच्या नावाने धंदा केला जात आहे. संस्कृतीचा वापर हा केवळ मनोरंजनासाठी केला जाऊ लागला असून धर्म हाही पैसे कमावण्यासाठीचे साधन बनला असल्याचे साठे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.