>> विधानसभेत आणखी तीन पुतळ्यांची मागणी
>> भाजप व मगोचे खासगी ठराव
पर्वरी येथील विधानसभा संकुलात पुतळे उभारण्याच्या प्रश्नावरून शह काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. काल डिचोलीचे भाजपचे आमदार राजेश पाटणेकर यांनी पर्वरी येथे विधानसभा संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा खासगी ठराव सादर केला. तर सावर्डे मतदारसंघाचे मगोपचे आमदार दीपक पाऊसकर यांनी डॉ. राम मनोहर लोहिया आणि टी. बी. कुन्हा यांचे पुतळे उभारण्यासंबंधी खासगी ठराव सादर केला आहे.
भाजपचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो, राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी डॉ. जॅक सिक्केरा यांचा पुतळा उभारण्यासंबंधी खासगी ठराव सोमवारी सादर केला आहे. फातोर्ड्याचे आमदार तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी विधानसभा संकुलात डॉ. जॅक सिक्केरा यांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाजपच्या आमदार व पदाधिकारी यांच्या बैठकीत पर्वरी येथे आणखीन पुतळे उभारण्यास विरोध करणारा ठराव घेतलेला असताना भाजपचे आमदार तथा उपसभापती लोबो यांनी पुतळ्याबाबत खासगी ठराव सादर केला आहे. पर्वरी येथील नवीन पुतळा बसविण्याच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापले आहे. राजकारण्यांकडून आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. सत्ताधारी गटात जॅक सिक्वेरांच्या पुतळ्याच्या प्रश्नावरून दोन गट निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत डॉ. जॅक सिक्केरा यांचा पुतळा उभारण्यासाठी खासगी ठराव दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, अद्यापपर्यंत कॉँग्रेस पक्षाच्यावतीने खासगी ठराव दाखल करण्यात आलेला नाही.
मगोच्या बैठकीत पडसाद
राज्यातील पुतळ्याच्या प्रश्नावरून राजकीय पातळीवर अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याने आणीबाणीच्या वेळी गरज भासल्यास महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी विधिमंडळ गट आणि केंद्रीय कार्यकारिणीला अधिकार देण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे, अशी माहिती मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली. या बैठकीला मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दीपक पाऊसकर, कार्याध्यक्ष नारायण सावंत, सरचिटणीस लवू मामलेदार, उपाध्यक्ष रत्नकांत म्हार्दोळकर व इतरांची उपस्थिती होती.
ठरावांबाबत योग्य वेळी
योग्य निर्णय : सभापती
विधानसभा संकुलात पुतळे उभारण्याबाबत दाखल करण्यात येणार्या ठरावांबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. विधानसभेचे अधिवेशन १९ फेब्रुवारीपासून सुरू होत असून पुतळा प्रश्नावरून ते गाजण्याची शक्यता आहे. पक्षाचा विरोध असूनही उपसभापती मायकल लोबो यांनी विधानसभेत जॅक सिक्वेरांचा पुतळा उभारण्याविषयी खासगी ठराव दाखल केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनीही सिक्वेरांच्या पुतळ्यासाठी खासगी ठराव सादर केला आहे. भाजपचे आमदार पाटणेकर व मगोचे दीपक पाऊसकर यांनी अन्य महान व्यक्तींचे पुतळे उभारण्यासाठी खासगी ठराव दाखल केल्याने राजकीय पक्षांत पुतळे प्रश्नावरून सध्या चढाओढ सुरू आहे.