तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात अनुभवी स्फोटक फलंदाज सुरेश रैना याचे पुनरागमन झाले आहे. सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेतील तुफानी फलंदाजीच्या जोरावर त्याने टीम इंडियात स्थान मिळविले आहे. रैनाच्या परतण्यामुळे श्रेयस अय्यर याला मात्र बाहेर बसावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेला १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे.
बासिल थम्पी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर व मोहम्मद सिराज यांना देखील जागा राखता आलेली नाही. अष्टपैलू अक्षर पटेल व वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर यांना संघाची दारे उघडण्यात आली आहे. लग्नामुळे श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला मुकलेला कर्णधार विराट कोहली व वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार तसेच वैयक्तिक कारणास्तव माघार घेतलेला सलामीवीर शिखर धवन संघात परतला आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरेश रैनाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
भारतीय टी-२० संघ ः विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक हार्दिक पंड्या, मनीष पांडे, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनाडकट व शार्दुल ठाकूर