टॅक्सीवाल्यांचा आजही संप ः उत्तर गोव्यात जमावबंदी

0
126

>> विरोधी नेत्यांचा आंदोलकांना पाठिंबा; गोवा फॉरवर्डच्या मंत्र्यांची आंदोलनस्थळी उपस्थिती

राज्यातील पर्यटक टॅक्सी मालकांनी विविध मागण्यांसाठी काल आयोजित राज्यव्यापी टॅक्सी वाहतूक बंद आंदोलनाच्या वेळी सरकारी यंत्रणेकडून कोणतेही ठोस आश्‍वासन देण्यात न आल्याने संप शनिवारी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सरकारने टॅक्सी मालकांचा संप मोडून काढण्यासाठी उत्तर गोव्यात जमाव बंदीचा आदेश काल संध्याकाळी जारी केला. या आदेशामुळे टॅक्सी मालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी जमावबंदीचा आदेश जारी केला असून शनिवार दि. २० रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत आदेश कायम राहणार आहे.

उत्तर आणि दक्षिण गोवा पर्यटक टॅक्सी मालक संघटनानी संयुक्तपणे आयोजित पर्यटक टॅक्सी बंदला पूर्ण पाठिंबा लाभल्याचा दावा टॅक्सी मालकांनी केला. या बंदच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक खाते, कदंब वाहतूक महामंडळ, पर्यटन खाते यांनी रेल्वे स्टेशन, विमानतळ या ठिकाणी पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध केली होती. ही सेवा अपुरी असल्याने काही भागात पर्यटकांना त्रास सहन करावा लागला. टॅक्सी मालकांनी बंदच्या काळात येथील आझाद मैदानावर शुक्रवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ यावेळेत धरणे धरले.

बसमालक संघटनेचा
टॅक्सीवाल्यांना पाठिंबा
अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदिन ताम्हणकर यांनी टॅक्सी मालकांना पाठिंबा जाहीर केला आहे. टॅक्सी मालकांच्या समस्यावर तोडगा न काढल्यास प्रसंगी खासगी बसवाहतूक बंद करण्याचा इशारा ताम्हणकर यांनी दिला. कॉँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, माजी मुख्यमंत्री तथा आमदार रवी नाईक, महिला कॉँग्रेसच्या अध्यक्ष ऍड. प्रतिमा कुतिन्हो, आपचे राज्य समन्वयक एल्वीस गोम्स, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी टॅक्सी मालकांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला. भाजपचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी वैयक्तीक पाठिंबा जाहीर केला. परंतु, कोणतेही ठोस आश्‍वासन ते देऊ शकले नाहीत. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी आंदोलन स्थळी आझाद मैदानावर केवळ उपस्थिती लावली. टॅक्सी मालकांसमोर कोणतीही जाहीर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास त्यांनी नकार दिला.
राज्यातील पर्यटक टॅक्सी मालकांच्या समस्याबाबत सरकारला सहा महिन्यापूर्वी निवेदन सादर करण्यात आले होते. यात पर्यटक टॅक्सींना गतिनियंत्रक, मीटर, वाहतूक खात्याकडून टॅक्सी मालकांची होणारी सतावणूक व इतर मुद्दे मांडण्यात आले आहेत. राज्यात खासगी वाहनांकडून पर्यटकांची बेकायदा वाहतूक केली जात आहे. त्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. टॅक्सी मालकांच्या मुद्यांची दखल घेतली जात नाही, असे उत्तर गोवा पर्यटक टॅक्सी मालक संघटनेचे अध्यक्ष वासुदेव आर्लेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पर्यटक टॅक्सीना गतीनियंत्रक का?
राज्यातील रस्त्यांचे रूंदीकरण करून चार, सहा पदरी रस्ते बांधण्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावरून धावणार्‍या इतर गाड्यांना गतिनियंत्रक नाही. केवळ पर्यटक टॅक्सींना गतिनियंत्रक का ? असा प्रश्‍न आर्लेकर यांनी उपस्थित केला.
नीलेश काब्राल यांनी पर्यटक टॅक्सी मालकांवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. राज्यात पर्यटकांचे प्रमाण कमी झाल्यावर त्याचे खापर पर्यटक टॅक्सी मालकावर फोडले जाते. नीलेश काब्राल आणि सावियो मेसियस यांनी पर्यटन व्यवसायाचे नुकसान केले आहे. पर्यटकांच्या गर्दीच्या वेळी हॉटेल मालकांकडून रूमच्या भाडेदरात दामदुप्पट वाढ केली जाते. या हॉटेल मालकांना कुणीच विचारत नाही. पर्यटक महामंडळाने आपल्या सर्व रेसिडेन्सी बिगर गोमतकीयांना भाडेपट्टीवर दिल्या आहेत. पर्यटन महामंडळाने हिम्मत असल्यास सर्व रेसिडेन्सी स्वतः चालवाव्यात. पर्यटन टॅक्सी हा एकच व्यवसाय गोमंतकीयाच्या ताब्यात आहे, असा दावा आर्लेकर यांनी केला.

गडकरींची भेट मिळाली नाही
केंद्रीय रस्ता, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर पर्यटक टॅक्सी मालकांच्या समस्या मांडण्यासाठी ४ वेळा भेट घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट मिळू शकली नाही. त्यामुळे भाजपचे दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. खासदार सावईकर यांनी टॅक्सी मालकांच्या समस्या एका पत्राद्वारे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर मांडून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे, असे रवींद्र वेंगुर्लेकर यांनी सांगितले. पर्यटक टॅक्सी मालकाच्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर पणजी परिसरातील काही खासगी वाहतूक करणार्‍या बसमालकांनी सुध्दा आपल्या बसगाड्या बंद ठेवल्याने गैरसोय झाली आहे. स्कूल व इतर आस्थापनांसाठी चालणार्‍या बसगाड्या बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना भुर्दंड सोसावा लागला. दाबोळी विमानतळावरील काळ्या- पिवळ्या टॅक्सी चालकांकडून बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. इतर टॅक्सीवाल्यांनी पूर्ण बंद पाळला. काणकोण प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात पर्यटक टॅक्सी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. गती नियंत्रकामुळे पर्यटक टॅक्सी चालकांना त्रास सहन करावा लागणार आहे, असा टॅक्सी मालकांचा दावा आहे.

…तर ओला, उबरला निमंत्रित करणार ः ढवळीकर
राज्यातील पर्यटक टॅक्सी मालकांनी आज (शनिवारी) आपला संप मागे न घेतल्यास वाहतूक खाते ओला, उबर सारख्या परराज्यातील टॅक्सी व्यावसायिकांना राज्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी निमंत्रित करणार आहे, असा इशारा वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिला.

राज्यातील पर्यटक टॅक्सी मालकांचा संप बेकायदा आहे, असा दावा मंत्री ढवळीकर यांनी केला. सरकारला परराज्यातील टॅक्सी वाहतूकदारांना सेवा उपलब्ध करण्यास परवानगी देण्यास भाग पाडू नये. पर्यटक टॅक्सी मालक संघटनेच्या पदाधिकार्‍याच्या हेकेखोर वृत्तीमुळे तसा निर्णय घ्यावा लागल्यास त्याला सर्वस्वी टॅक्सी असोसिएशनचे पदाधिकारी जबाबदार राहतील, असेही ढवळीकर यांनी म्हटले आहे. सरकारच्या विविध खात्याने भाडेपट्टीवर घेतलेल्या परंतु, शुक्रवारी टॅक्सी मालकांच्या बंदमुळे गैरहजर राहिलेल्या टॅक्सीची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संपाच्या काळात गैरहजर राहिलेल्या टॅक्सीची माहिती सरकारला सादर करण्याची सूचना संबंधित खात्याना करण्यात आली आहे. येणार्‍या काळात बंद ठेवण्यात आलेल्या टॅक्सीचा परवाना रद्दबातल किंवा निलंबित करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही मंत्री ढवळीकर यांनी म्हटले आहे.

स्पीड गव्हर्नरबाबतची मागणी
पूर्ण करणे अशक्य ः पर्रीकर

संपावर गेलेल्या व शांततापूर्णरित्या बंदमध्ये सामील झालेल्या टॅक्सीचालकांवर सरकार कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र, कुणी हिंसाचार केला व कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. टॅक्सींना स्पीड गव्हर्नर बसवू नये ही त्यांची मागणी रास्त नाही. त्यामुळे ती पूर्ण करता येणार नसल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. स्पीड गव्हर्नर बसवण्याचा आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही तर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होणार असून त्यासाठी सरकारला जबाबदार धरले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
टॅक्सीवाले आपणाला कोणतीही कल्पना न देता संपावर गेले. आपल्या मागण्यांचे एक निवेदन सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने आपणाला दिले नाही. ते संपावर जात असल्याचे कळले तेव्हा त्यांना संपावर न जाण्याची सूचना केली होती. मात्र, ती त्यांनी धुडकावून लावल्याचे पर्रीकर म्हणाले.