चर्चिल ब्रदर्सने दोन्ही सत्रात प्रत्येकी एक गोल नोंदवून काल शुक्रवारी आपल्या घरच्या मैदानावर शिलॉंग लाजॉंगचा २-० असा पराभव केला. आय लीग स्पर्धेतील हा सामना वास्को येथील टिळक मैदानावर खेळविण्यात आला. चर्चिलने दोन्ही सत्रात चेंडूवर अधिकवेळ नियंत्रण राखत गोलसंधी निर्माण केल्या. त्यांच्या ओसागी मंडे (८वे मिनिट) व पीएम ब्रिटो (७६वे मिनिट) यांनी गोलजाळीचा अचूक वेध घेतला.
शिलॉंग लाजॉंगने सामन्याच्या दुसर्या सत्रात चर्चिलचा बचाव भेदण्यात जवळपास यश मिळविले होते. परंतु, सर्वप्रथम सायहू जागने व यानंतर पी. लालरोहला यांनी लगावलेला फटके गोलपोस्टला लागून बाहेर गेल्याने त्यांची संधी धोडक्यात हुकली.
सलग दुसर्या विजयासह चर्चिलने ८ सामन्यांतून आपली गुणसंख्या ७ केली असून त्यांच्या संघ नवव्या स्थानी आहे. सलग दुसर्या पराभवामुळे शिलॉंगचा संघ ११ सामन्यांतून १४ गुणांसह चौथ्या स्थानी कायम आहे. चर्चिलने गोकुळम केरलाविरुद्धच्या विजयी संघात चार बदल करताना देनाचंद्रम मैतेई, रिचर्ड कॉस्ता, दौदा सीसे व बचावपटू हुसेन एल्दोर यांना खेळविले तर सूरज, निकोलस फर्नांडिस, पीटर ओमूदूमुके व जोवेल मार्टिन्स यांना बाहेर बसविले.