पाचव्या फेरीत आनंदची बरोबरी

0
98

पाचवेळच्या विश्‍वविजेत्या भारताच्या विश्‍वनाथन आनंद याला टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत गुण विभागून घ्यावा लागला. चीनच्या वेई यी यान आनंदला बरोबरी मान्य करावी लागली. पाच सामन्यांतून तीन बरोबरींसह विद्यमान जलद बुद्धिबळ विश्‍वविजेता आनंद ३.५ गुणांसह संयुक्तरित्या अव्वल स्थानी आहे.
नेदरलँड्‌सचा अनीश गिरी व अझरबैजानचा शाखरियार मामेद्यारोव हेदेखील दुसर्‍या क्रमांकावर आहेत.

सहाव्या फेरीत आनंदला काळ्या मोहर्‍यांनिशी खेळावे लागेल. अनीश गिरी त्याचा प्रतिस्पर्धी असेल. गिरीला इंग्लंडच्या ग्वेन जोन्स याने बरोबरीत रोखले तर शाखरियारने अमेरिकेच्या फाबियानो कारुआना याचा पराभव केला. अन्य भारतीयांमध्ये भास्करन अधिबन याला सलग तिसर्‍या पराभवचा सामना करावा लागला. अमेरिकेच्या वेस्ली सो याने त्याला पराभवाचा डोस पाजला. स्पर्धेच्या आठ फेर्‍या शिल्लक असताना मॅग्नस कार्लसनसह वेस्ली व क्रामनिक ही दुकलीदेखील द्वितीय स्थानी आहे.

पाचव्या फेरीचे अन्य निकाल (मास्टर्स) ः पीटर स्वीडलर (रशिया, २.५) वि. वि. यिफान होऊ (चीन, ०.५), मॅग्नस कार्लसन (नॉर्वे, ३) बरोबरी वि. व्लादिमीर क्रामनिक (रशिया, ३), मॅक्सिम मातलाकोव (रशिया, २.५) बरोबरी वि. सर्जेई कर्जाकिन (रशिया, २.५)