इंग्लंडने बांगलादेशला तुडवले

0
89

कर्णधार हॅरी ब्रूक याने झळकावलेले नाबाद शतक (१०२) व युआन वूड्‌स (४८) याच्यासह केलेल्या १२८ धावांच्या अविभक्त भागीदारीच्या बळावर इंग्लंडने काल गुरुवारी बांगलादेशचा ७ गड्यांनी पराभव केला. आयसीसी अंडर १९ क्रिकेट स्पर्धेतील ‘सी’ गटातील हा सामना एकतर्फी ठरला.

बांगलादेशने विजयासाठी ठेवलेले १७६ धावांचे लक्ष्य इंग्लंडने २९.३ षटकांत गाठले. या विजयासह इंग्लंडने अंतिम आठमधील आपला प्रवेश जवळपास निश्‍चित केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर बांगलादेशची सुरुवात डळमळीत झाली. २७ धावांत त्यांचे ४ गडी तंबूत परतले होते. अफिफ हुसेन (६३) व अमिनूल इस्लाम (३१) यांनी पाचव्या गड्यासाठी ९४ धावांची भागीदारी करत त्यांचा डाव सावरला. धोकादायक ठरू पाहत असलेली ही जोडी युआन वूड्‌स याने फोडली. त्याने सर्वप्रथम अमिनूलला व यानंतर अफिफचा बळी घेत बांगलादेशला ६ बाद १२३ असे अडचणीत आणले. नईम हसन धावबाद झाल्याने त्यांची आगीतून फोफाट्यात अशी स्थिती झाली. या लागोपाठच्या तीन धक्क्यानंतर तळाला हसन महमूद (२३) व यष्टिरक्षक अंकोन (२०) यांनी संघाला दीडशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.

इंग्लंडकडून वूड्‌सने २६ धावांत ३, इथन बांबरने १९ धावांत ३ गडी बाद करत भेदक मारा केला. बांगलादेशप्रमाणे इंग्लंडची सुरुवातही खराब झाली. अर्धशतक फलकावर लागेपर्यंत त्यांचे आघाडीची तिन्ही फलंदाज बाद झाले होते. बांगलादेशचा संघ वर्च्व गाजविण्याच्या तयारीत असताना ब्रूक व वूड्‌स यांच्या भागीदारीने बांगलादेशवर दारुण पराभव लादण्याचे काम केले.