जनमत कौल दिनाचे सरदेसाईंकडून राजकारण

0
165

>> गोवा सुरक्षा मंचाची टीका

विधानसभा संकुलात जॅक सिक्वेरा यांचा पुतळा बसविण्याची आक्रस्ताळी मागणी करून मंत्री विजय सरदेसाई जनमत कौल दिनाचे राजकारण करीत असल्याचा आरोप गोसुमंचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी केला आहे.

गोवा फॉरवर्डने भाजपशी हातमिळवणी करून सरकार स्थापन केल्याने ख्रिस्ती मतदार दुखावला आहे. त्यांचे आता लांगुलचालन करण्यासाठी गोवा फॉरवर्डने जनमत कौलाचे भांडवल करून विकृत राजकारण सुरू केल्याचे शिरोडकर यांनी म्हटले आहे. मतांच्या राजकारणासाठी वेळोवेळी रंग बदलण्याच्या या वृत्तीमुळे भावी काळात ‘ना घरका ना घाटका’ अशी पाळी गोवा फॉरवर्ड पक्षावर आल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही मंचाने केली आहे.

स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठीच सरदेसाई जनमत कौलाचे भांडवल करत असल्याचे गोव्याच्या जागृत जनतेच्या लक्षात आले आहे, असे शिरोडकर म्हणाले.
विधानसभा संकुलात अन्य कोणाचाही पुतळा उभारणे म्हणजे गोव्याचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांचा तो अपमान ठरेल. मगो पक्ष जरी आपल्या मूळ ध्येयापासून भरकटत गेला असला तरी भाऊसाहेबांचे हजारो चाहते सरदेसाईंकडून भाऊसाहेबांच्या होत असलेला अपमान कदापि सहन करणार नाहीत व त्यांच्या रोषास त्यांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही शिरोडकर यांनी दिला आहे.

जनमत कौल हा गोव्याच्या ‘स्वतंत्र अस्तित्वाच्या’ परीक्षेची घडी होती. गोव्याच्या त्यावेळच्या जागृत जनतेने गोव्याच्या स्वातंत्र्य अस्तित्वाच्या बाजूने मतदान केले. मतदान करणारे सगळ्या धर्माचे व पक्षाचे लोक होते. कौल देताना जनता राजकीयदृष्ट्या प्रभावित होऊ नये व स्वतःच्या मर्जीनुसार जनतेने मतदान करावे म्हणून स्वतः भाऊसाहेब बांदोडकर व इतर मंत्र्यांनी आपापल्या मंत्रिपदाचे राजीनामे देऊन सर्वसामान्यांप्रमाणे जनमत कौलाला सामोरे गेले होते. त्यामुळे इतर सर्व नेत्यांना डावलून फक्त जॅक सिक्वेरांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारणे म्हणजे हे फक्त मतांचे राजकारण असल्याचे शिरोडकर यांनी म्हटले आहे. विधानसभेच्या संकुलात जॅक सिक्वेरा यांचा पुतळा बसविण्याच्या विजय सरदेसाई यांच्या मागणीचा गोवा सुरक्षा मंच धिक्कार करत आहे, असेही मंचाने म्हटले आहे. जॅक सिक्वेरा यांना जनमत कौलाचे जनक म्हणणे म्हणजे गोव्याचे आधी संघप्रदेश म्हणून व नंतर घटक राज्य म्हणून संवर्धन करणार्‍यांचा घोर अपमान ठरेल, असे मतही शिरोडकर यांनीव्यक्त केले.