
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे सहा दिवसांच्या भारत दौर्यासाठी काल येथे आगमन झाले. शिष्टाचाराला फाटा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विमानतळावर गळाभेट घेऊन नेतान्याहू यांचे स्वागत केले. त्यांच्याबरोबर सुमारे दिडशे उद्योजकांचे शिष्टमंडळही भारतात दाखल झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात इस्रायली पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मोदी-नेतान्याहू यांच्यात आज पहिली द्विपक्षीय चर्चा होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट ते घेणार आहेत.
या दौर्यादरम्यान उभय देशांमध्ये संरक्षण, कृषी, पाणी, विज्ञान-तंत्रज्ञान, अंतराळ सुरक्षा, दहशतवादाचा मुकाबला अशा महत्वपूर्ण विषयांवर तपशिलवार चर्चा होणार आहे. भारत-इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नेतान्याहू भारतात आले आहेत. या दौर्या दरम्यान ते दिल्लीसह आग्रा, अहमदाबाद, मुंबर्ई या शहरांना भेटी देणार आहेत.